निखिल रोकडे
नाशिक : भोंदू अशोक खरात याचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत असून, त्याच्या अश्लील कृत्यांचा पर्दाफाश केवळ योगायोग नव्हता, तर त्यामागे खोलवर आर्थिक व्यवहारांचा गुंता आणि विश्वासघाताची वेदना दडलेली होती. स्वतःभोवती भक्तांचा मोठा गोतावळा निर्माण करून त्याने विश्वासाचे जाळे विणले होते. या भक्तांमध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, शासकीय अधिकारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांचा मोठा सहभाग होता. खरात स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत असे; मात्र त्याच्या कृतींमध्ये आर्थिक स्वार्थ लपलेला होता. गुंतवणुकीच्या नावाखाली तो मोठमोठ्या जमिनी विकत घेण्याच्या योजना मांडत असे आणि स्वतःचे अल्प भांडवल गुंतवून इतरांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उभा करत असे.
भोंदू खरात हा या पैशातून खरेदी केलेल्या मालमत्तेवर हळूहळू स्वतःचा ताबा मिळवत असे. त्यामुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन केले. विश्वासघात आणि फसवणूक उघड होताच काही प्रभावशाली व्यक्तींनी त्याला धडा शिकवण्याचा निर्धार केला. त्याच्या जवळच्यांनीच त्याच्याविरुद्ध कारस्थान रचल्याने त्याचे तथाकथित आध्यात्मिक साम्राज्य कोसळले. अशा प्रकारे आर्थिक व्यवहारातून सुरू झालेला संघर्ष अखेर त्याचे अश्लील कृत्य उघडकीस येण्यास कारणीभूत ठरला आणि त्याचे बिंग पूर्णपणे फुटले.
7 ते 13 मार्च : निर्णायक टप्पा
7 मार्च ते 13 मार्च या कालावधीत घडलेल्या घटनांनी या प्रकरणाला निर्णायक स्वरूप दिले. तपासाची गती वाढत असताना अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखली आणि तत्काळ वरिष्ठ पातळीवर माहिती पोहोचवली. त्यांनी गृहमंत्र्यांना सविस्तर अहवाल सादर करत या प्रकरणाचे सामाजिक परिणाम स्पष्ट केले. या अहवालानंतर प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता कठोर भूमिका घेतली. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता स्पष्ट आदेश देण्यात आले की, या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणालाही वाचवले जाऊ नये. तपास अधिक वेगाने आणि काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करण्यावर भर दिला आणि संबंधित व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले. या सर्व हालचालींमुळे प्रकरणाचा वेग वाढला आणि परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ लागली. या टप्प्यावर एक गोष्ट निश्चित झाली होती की, अशोक खरात याच्याविरुद्ध ठोस कारवाई होणारच आहे. त्यामुळे त्याच्या अटकेची प्रक्रिया केवळ औपचारिकता उरली होती.
तक्रारींच्या धाग्यातून उलगडलेले रहस्य
या प्रकरणाची सुरुवात शिर्डी येथे एका तरुणीच्या तक्रारीने झाली. संबंधित तरुणीने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितले की, तिचे फोटो वापरून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अश्लील व्हिडीओ तयार करुन तिला ब्लॅकमेल केले जात आहे. या तक्रारीनंतर तपासादरम्यान अहिल्यानगर येथेही याच स्वरूपाची तक्रार दाखल असल्याची माहिती समोर आली. तांत्रिक तपास करताना पोलिसांना एक महत्त्वाचा धागा सापडला. धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाईल क्रमांक आधीच पोलिसांच्या ताब्यात होता. त्यामुळे शिर्डीतील तक्रारीबाबत संशय निर्माण झाला. या दोन्ही घटनांमध्ये साम्य आढळले. पोलिसांनी संशयित आरोपीच्या मोबाईलची तपासणी करताना अनेक व्हिडीओ सापडले आणि त्यातून एका मोठ्या जाळ्याचा उलगडा झाला.