Ashok Kharat case SIT investigation reaches final stage
नाशिक : भोंदू अशोक खरात याच्याविरोधातील गुन्ह्यांचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंत १०५ हन अधिक साक्षीदारांची चौकशी केली आहे, अशी माहिती विशेष तपास पथकाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांनी गुन्हा क्रमांक ७३/२०२६ चा तपास एसआयटीमार्फत करण्याचे आदेश दिल्यानंतर २० मार्च २०२६ पासून या आणि इतर १० अशा एकूण ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला आहे.
या विशेष तपास पथकामध्ये दोन पोलिस उपअधीक्षक, तीन पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक, दहा पोलिस उपनिरीक्षक आणि सहा पोलिस अंमलदार अशा एकूण २४ अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यात अशोक खरातविरोधात एकूण १७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे आहे. तीन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलिस, तीन गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलिस तर दोन गुन्ह्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलिस करत आहेत.
एसआयटीकडे असलेल्या ११ गुन्ह्यांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे, फसवणुकीचा एक गुन्हा तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे समाविष्ट आहेत. तपासादरम्यान आरोपी अशोक खरात हा पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचे उघड झाले आहे. खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा, विधी आणि दैवी शक्तींचे भय दाखवून तो लोकांकडून पैसे उकळत होता. तसेच महिलांना बदनामीची धमकी देत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात समोर आले आहे.
ईशानेश्वर मंदिर परिसरात पुरावे अंधाराचा फायदा घेत हातचलाखीने चमत्कार घडवत असल्याचा आभास निर्माण करून समाजात अंधश्रद्धा पसरविल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मौखिक, भौतिक, दस्तऐवज, परिस्थितीजन्य आणि इलेक्ट्रॉनिक एसआयटीला प्राप्त झाले असून, त्याआधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महिलांवरील अत्याचार प्रकरणात कायद्यानुसार ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. अशोक खरातविरोधातील लैंगिक अत्याचाराचा पहिला गुन्हा १७ मार्च २०२६ रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आठवडाभरात आणखी सात गुन्हे नोंदविण्यात आले. आतापर्यंत दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून, उर्वरित प्रकरणांतील दोषारोपपत्रेही लवकरच दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली.
दरम्यान, पीडित महिलांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडिओ हटविण्यासाठी एसआयटीच्या सायबर टीमने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सायबरच्या मदतीने १३ हजार १७५ लिक हटविण्यात आल्या असून, ४५१ सोशल मीडिया अकाउंट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
अशोक खरात हा विविध गुन्ह्यांमध्ये एकूण ४९ दिवस एसआयटी कोठडीत होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, इतर गुन्ह्यांमध्येही त्याला अटक करण्यात आलेली आहे. तपासातून पुढे आणखी पुरावे समोर येण्याची शक्यता असून, आवश्यकतेनुसार पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे एसआयटीने स्पष्ट केले आहे.
एकूण दाखल गुन्हे : १७
एसआयटीकडे तपास असलेले गुन्हे : ११
लैंगिक अत्याचाराचे गुन्हे : ०८
फसवणुकीचा गुन्हा : ०१
साक्षीदारांवर दबावाचे गुन्हे : ०२
एसआयटी पथकातील अधिकारी व कर्मचारी: २४
चौकशी केलेले साक्षीदार : १०५ हून अधिक
हटविण्यात आलेल्या आक्षेपार्ह लिंक : १३,१७५
बंद करण्यात आलेली सोशल मीडिया अकाउंट: ४५१
दाखल दोषारोपपत्रे : ०२
एसआयटी कोठडीतील कालावधी : ४९ दिवस
नाशिक व नगर जिल्ह्यातील तपास सुरू असलेले गुन्हे: १७ गुन्हे
बनावट खाते प्रकरणी खरातला पाच दिवस कोठडी
नाशिक : सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील श्री माता जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमधील बनावट खात्यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी भोंदू अशोक खरातला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणात पतसंस्थेत ३२ नागरिकांच्या नावाने बनावट खाती उघडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फिर्यादी नारायण घोटेकर यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पतसंस्थेत संगनमताने बनावट खाती उघडण्यात आली.
खाते उघडताना आवश्यक आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच ओळख पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे काही मयत व्यक्तींच्या नावानेही खाते सुरू करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी अविनाश वामन कांडेकर यालाही यापूर्वी अटक करण्यात आली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच पतसंस्थेतील संबंधित कर्मचारी आणि संचालक मंडळाचाही तपास सुरू आहे.
पोलिसांनी तपासादरम्यान पतसंस्थेची ठराव पुस्तके, लेखापरीक्षण अहवाल तसेच बनावट खात्यांशी संबंधित मुदतठेवी आणि पैसे काढण्याच्या मूळ पावत्या जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली. या रकमांचा वापर कोणत्या व्यवहारासाठी करण्यात आला, कोणाच्या मदतीने खाती उघडण्यात आली तसेच त्या पैशांतून मालमत्ता खरेदी करण्यात आली का, याचा तपास आता केला जाणार आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे शोधण्यासाठी आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.