नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरातच्या विरोधातील महिला लैंगिक शोषण प्रकरण तपासाला आता अधिक गती मिळाली असून, फॉरेन्सिक टीम व विशेष तपास पथकाने (एसआयटी) कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टी या त्यांच्या कार्यालयात पुन्हा धाड टाकून सखोल तपासणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १२) सकाळी ११ च्या सुमारास एसआयटी आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक संबंधित कार्यालयात दाखल झाले. जवळपास ४० मिनिटे सुरू असलेल्या या तपासणीदरम्यान कार्यालयातील, कुजलेले पेढे, द्रव्य वस्तू तसेच इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली.
यावेळी अनेक महत्त्वाचे नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशोक खरातवर महिला लैंगिक शोषण तसेच फसवणुकीचे गंभीर आरोप असून, या प्रकरणाने राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
विविध भागातून पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदविल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. खरातच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे पथकाची या जबाबदारी सोपविण्यात आलेली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
आतापर्यंत त्यांच्या विरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे एकूण १५ गुन्हे दाखल झालेले असून, पुढील काही दिवसांत आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत.