Ashok Kharat Case 
नाशिक

Nashik Ashok Kharat Case | खरात प्रकरणी नगरसेविकेच्या पतीची कसून चौकशी

Nashik Ashok Kharat Case | नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती प्रभागातील असलेल्या नगरसेविकेच्या पतीला खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती प्रभागातील असलेल्या नगरसेविकेच्या पतीला खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यास गुन्हे शाखेकडून पोलिसी भाषेत कडक पाहुणचार करण्यात आला आहे. दिवसभरात पोलिस यंत्रणेने मीरगाव, नाशिकचे कर्मयोगीनगर, कॅनडा कॉर्नर कार्यालय, ईशान्येश्वर मंदिर येथे पथके पाठवून तपासणी केली.

तसेच घराच्या मंदिरातील पुजारी, कार्यालयीन सहायक व त्याला सहकार्य करणारे त्याच्या जवळच्या व्यक्तींचीसुद्धा कसून चौकशी केली आहे. याशिवाय, खरात याच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास, फसवणूक किंवा अन्य गुन्हेगारी कृत्य अनुभवले असल्यास संबंधित पीडितांनीही पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे स्पष्ट केले आहे.

माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी हमी पोलिसांनी दिली आहे. या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करत असून, तपास वेगाने सुरू आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्यात येत आहे. एकूणच, या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणतीही माहिती दडवू नये, त्वरित पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींची होणार चौकशी

या प्रकरणांमध्ये आतापर्यंत खरातचे राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात आमदार, खासदार, नगरसेवक व नगरसेविकांचे पती यांचा सुद्धा संपर्क असल्याचे आढळले आहे. अनेकांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरातशी संपर्क केला होता व त्याच्याकडून धार्मिक विधी केले होते. यामध्ये इच्छुक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न, तिकीट कापणे, उमेदवारी मिळविणे तसेच विवाहबाह्य संबंध, आर्थिक समस्या अशा कारणांसाठी अनेक राजकीय पार्श्वभूमी असलेले खराताच्या संपर्कात होते. त्यामुळे आता यांची टप्प्याटप्प्याने कडक चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT