नाशिक : आपल्या अश्लील आणि काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्रात बदनाम झालेल्या भोंदू अशोक खरातने पाच नरबळी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. खरात याने पाच नरबळी दिल्याचा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी नाशिक सत्र न्यायालयात मंगळवारी केला. यामुळे न्यायालयही स्तब्ध झाले. न्यायाधीश आर. एच. पाटील यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला आणखी पाच दिवसांची म्हणजेच शुक्रवार (दि. 27) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान खरातचे वर्तन लक्ष वेधून घेणारे ठरले. युक्तिवाद सुरू असताना तो मान खाली घालून उभा राहिला होता आणि स्वत:च्या हाताच्या बोटांकडे एकटक पाहत असल्याचे दिसून आले. न्यायालयाने ‘काय हो, काही बोलायचे आहे का?’ असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने पाच वाक्यांत उत्तर दिले. दुपारी 3.50 च्या सुमारास कडक पोलिस बंदोबस्तात, तोंडावर काळा कपडा बांधून खरातला न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे 200 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता.
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, 67 वर्षीय खरात 30 वर्षांच्या महिलांशी संपर्क साधून त्यांचे शोषण करत होता. त्याच्या फार्म हाऊसमधून शस्त्रसाठा आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्याने तपासाची व्याप्ती मोठी आहे. मंदिरसंदर्भातील तपासात वाघ, साप आणि कस्तुरीसंबंधीही संशय व्यक्त करत वन कायद्यांतर्गत गुन्ह्याची शक्यता वर्तवण्यात आली. आरोपी महिलांना पेढे खाऊ घालून त्यानंतर पाणी देत असे. ज्यामुळे त्यांना मळमळ होत असल्याची माहिती देण्यात आली. खरातच्या फार्म हाऊसवरून 31 काडतुसे आणि पाच पुंगळ्या जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या शस्त्रांचा वापर नेमका कुठे झाला? वन्यजीवांची शिकार झाली का? याचा तपास सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.
कोर्टात खरात काय म्हणाला?
मला साप, वाघ याबाबत माहिती नाही.
मी हे पहिल्यांदाच ऐकत आहे.
मंदिरात कधीतरी जायचो, तेव्हा 100 च्या आसपास लोक असायचे.
शिवरात्री, श्रावणी सोमवारी जात होतो.
कोठडीत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
भोंदू खरातला आमच्या ताब्यात द्या : तृप्ती देसाई
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला आमच्या ताब्यात द्या, त्याच्या कानाखाली वाजवू द्या, अशी आक्रमक भूमिका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी घेत संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी खरातच्या तोंडाला काळे फासण्याचाही प्रयत्न केल्याचे कळते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत खरातला सुरक्षा घेऱ्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.