Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | 'आयएएस' महिला अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

भोंदू अशोक खरातच्या मदतीने जमीन खरेदी कनेक्शन उघड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असून, या प्रकरणाची व्याप्ती आता अधिकच वाढताना दिसत आहे. भोंदू खरातशी कनेक्शन असलेली आयएएस महिला अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खरातशी कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलीस यंत्रणेने त्या महिला अधिकाऱ्याची चौकशी सुरू केल्याचे समजते. यात, खरातच्या मदतीने संबंधित महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील अतिशय जवळच्या व्यक्ती तसेच एनजीओ चालवणारी फॅमिली फ्रेंड यांनी सिन्नर तालुक्यातील काही मोक्याच्या जमिनी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये उद्योजक संघटनेच्या नेत्याचे संदर्भ उघडकीस येत आहे.

तपास यंत्रणांच्या हालचालींवरून या प्रकरणाचे धागेदोरे थेट उच्चस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंधित कनेक्शनबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनातही या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या व्यवहारांमध्ये भोंदू अशोक खरातशी संबंधित नेटवर्क सक्रिय असल्याची चर्चा असून, या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या जमीन व्यवहारांमध्ये एमआयडीसी परिसरातील स्वतःला उद्योजकांची संघटनेचा सर्वेसर्वा समजणारा आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या उद्योजकाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. तो संबंधित व्यवहारांमध्ये लायझनिंगचे काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, एका उद्योजकाने अशोक खरातच्या जीवनावर आधारित 'उद्धारकर्ता' असा उल्लेख करणारे पुस्तक प्रकाशित केले होते. त्या उद्योजकानेही काही उद्योजकांच्या गटासह आणि एका संघटनेच्या नेत्याबरोबर या प्रकरणात पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. अशोक खरात हा शासकीय अधिकाऱ्यांच्या ‘चॉईस पोस्टिंग’मध्ये हस्तक्षेप करत असल्याचे यापूर्वीच चर्चेत होते. आता एका महिला आयएएस अधिकाऱ्यासाठी नाशिक जिल्हाधिकारीपद मिळवून देण्यासाठी त्याने लॉबिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित महिला अधिकारी या खरातच्या शिवनिका संस्थानांतर्गत येणाऱ्या ईशानेश्वर मंदिरात वारंवार भेट देत असल्याचेही समोर आले आहे. या भेटींचा नेमका उद्देश काय, तसेच त्यामागील संबंध किती खोलवर आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे. या सर्व प्रकरणातील आर्थिक व्यवहार, जमीन कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींचे परस्पर संबंध यांची सखोल छाननी केली जात आहे.

प्रशासनातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह

महिला अधिकाऱ्यास नाशिकमध्ये कार्यरत असताना कामकाजात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती तसेच विशिष्ट उद्देशाने काही अधिकाऱ्यांना टार्गेट केले होते. टार्गेट करून काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर एका दिवसातच एका अधिकाऱ्यावरील केलेली कारवाई मागे घेतली होती. यामागेदेखील खरात कनेक्शन असल्याची शक्यता व्यक्त आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT