एखादे प्रकरण केवळ गुन्ह्यापुरते मर्यादित राहात नाही, ते समाजाच्या मानसिकतेचे, नैतिकतेचे आणि तंत्रज्ञानाच्या वापराचे आरसाच बनते. भोंदू अशोक खरात प्रकरण हे नेमके तसेच ठरत आहे. या प्रकरणाने उघड केलेल्या विकृतीपेक्षा जास्त भीषण आहे, ती आपल्या समाजाची प्रतिक्रिया आणि त्याहून गंभीर आहे, ती 'डिजिटल फूटप्रिंट्स'ची अनिवार्य छाया. आज प्रश्न केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याचा नाही, तर संपूर्ण समाजाच्या नीतिमत्तेचा, संवेदनशीलतेचा आणि डिजिटल जबाबदारीचा आहे.
अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली आणि अनेक पातळ्यांवर समाजाला विचार करायला भाग पाडले. तथाकथित दैवी शक्ती, काळी जादू, भुलवणूक आणि लैंगिक शोषण यांचा गुंता उलगडत असताना, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या; मात्र, या घटनांपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे समाजातील नीतिमत्तेचा होत असलेला हास. पूर्वीही अशा प्रकारची प्रकरणे घडत असत, पण ती उघडकीस येत नव्हती. स्थानिक पातळीवर ती दाबली जात, पीडितांना गप्प बसवले जायचे आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने अनेक जण मौन पत्करत.
आज तंत्रज्ञानाने ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मोबाइल, सोशल मीडिया, क्लाउड आणि डिजिटल नेटवर्क्समुळे प्रत्येक कृतीचा ठसा उमटतो आणि तो कायमचा राहातो. 'डिजिटल फूटप्रिंट्स' ही केवळ तांत्रिक संज्ञा नसून, सामाजिक आणि कायदेशीर वास्तव झाली आहे. खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे चित्र समोर आले, ते अधिकच भयावह आहे. यात आरोपीच्या कृत्यांइतकाच मोठा प्रश्न आहे, तो पीडित महिलांच्या आयुष्यावर झालेल्या परिणामांचा.
गुन्हा एका व्यक्तीने केलेला असताना, त्याची सामाजिक शिक्षा मात्र अनेकांना भोगावी लागत आहे. समाजातील काही घटक या महिलांनाच दोष देताना दिसतात, 'त्या तिथे गेल्याच का?' हा प्रश्न सहजपणे विचारला जातो. पण हा प्रश्न विचारताना, त्या महिलांच्या परिस्थितीचा, त्यांच्या मानसिक अवस्थेचा किंवा त्यांच्या अडचणींचा विचार केला जात नाही. आयुष्यातील संकटे, ताणतणाव आणि असहायता माणसाला कुठल्याही आधाराच्या शोधात फरपटत नेतात, हे वास्तवदेखील समजून घ्यायला हवे. अशा वेळी कोणीतरी उपाय सांगतोय, हा विश्वासच त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
मानसशास्त्र सांगते की भुलवणूक, मानसिक नियंत्रण किंवा औषधांचा वापर करून व्यक्तीला जाळ्यात अडकवता येते. त्यामुळे पीडितांकडे संशयाने पाहण्यापेक्षा सहानुभूतीने पाहणे ही समाजाची जबाबदारी आहे. या प्रकरणाचा आणखी एक चिंताजनक पैलू म्हणजे त्याला मिळालेली सनसनाटी प्रसिद्धी. अनेक माध्यमे आणि सोशल प्लॅटफॉर्म्सवर या घटनेतील सुरस आणि विकृत बाजूंना जास्त महत्त्व दिले जात आहे.
माहिती देण्याऐवजी मनोरंजक करण्याची स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. समाज म्हणून आपण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की, विकृतीचा उपभोग घेतो आहोत, हा प्रश्न इथे निर्माण होतो. अशा प्रकारच्या चर्चेमुळे समाजात विकृत कुतूहल वाढते आणि मूळ मुद्दे मागे पडतात. माध्यमांची जबाबदारी केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून, समाजाला दिशा देण्याचीही असते. परंतु टीआरपी किंवा व्ह्यूजच्या स्पर्धेत ही जबाबदारी अनेकदा दुय्यम ठरते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
राजकीय स्तरावरही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. रोहित पवार यांनी काळ्या जादूसंदर्भात केलेले विधान हे नव्या वादाला तोंड फोडणारे ठरले. एखाद्या अपघाताला किंवा घटनेला काळ्या जादूशी जोडणे म्हणजे अंधश्रद्धेला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणे होय. विज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या दाव्यांना महत्त्व देणे ही चिंतेची बाब आहे. समाजात आधीच अंधश्रद्धेविरुद्ध चळवळी सुरू असताना, अशा विधानांमुळे सामान्य माणसाच्या मनात गोंधळ निर्माण होतो. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी बोलताना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिणाम यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे..
या संपूर्ण प्रकरणात सर्वात ठळकपणे समोर येणारा मुद्दा म्हणजे डिजिटल माध्यमांची अनियंत्रित ताकद आणि त्यातून निर्माण होणारी कायमस्वरूपी नोंद. एकदा एखादा फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवर गेला की, तो पूर्णपणे हटवणे जवळपास अशक्य असते. पोलिसांनी लिंक हटवल्या, तरी त्या फाइल्स अनेकांच्या मोबाइल, हार्डडिस्क किंवा क्लाउडमध्ये साठवलेल्या असतात. डिजिटल साक्ष (Digital Evidence) आज न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, चॅट हिस्ट्री, फोटो आणि व्हिडिओ हे सर्व पुरावे गुन्हे सिद्ध करण्यात निर्णायक ठरतात; पण याच डिजिटल साक्षींचा उलट परिणाम पीडितांवरही होतो कारण त्यांचे जगणे कठीण करणारे क्षण सार्वजनिक होतात.
यामुळे पीडितांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. नोकरी टिकवणे कठीण होते, सामाजिक दबाव वाढतो, मानसिक ताण असा होतो. काहींना घरातून काम करण्याची वेळ येते, तर काहींना समाजातूनच दूर व्हावे लागते. याचे गंभीर परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतात. नैराश्य, भीती, आत्मविश्वासाचा अभाव आणि सामाजिक एकाकीपणा यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये केवळ कायदेशीर मदत पुरेशी नसून, मानसोपचार आणि सामाजिक आधारही आवश्यक ठरतो.
आज प्रत्येक कॉल ट्रेस होऊ शकतो, प्रत्येक लोकेशन रेकॉर्ड होते आणि प्रत्येक डिजिटल संवाद कुठेतरी साठवला जातो. आपण नकळत दिलेल्या अॅप परवानग्यांमुळे आपली वैयक्तिक माहिती सहज उपलब्ध होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होते. नीतिमत्ता ही आता पर्याय नसून, अपरिहार्यता झाली आहे. सार्वजनिक जीवनात असणाऱ्यांसाठी तर ही बाब अधिकच महत्त्वाची आहे. राजकारण, समाजकारण किंवा कोणतेही क्षेत्र असो, दीर्घकालीन यशासाठी चारित्र्य, पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे.
एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा क्षण किंवा एक चुकीचा संबंध आयुष्यभरासाठी परिणाम घडवू शकतो. खरातने आपल्या कृत्यांना 'विधीचा भाग' असल्याचे सांगितले आहे, पण हे विधी नेमके काय होते, त्यांची सत्यता काय आहे आणि त्याची पडताळणी कशी होणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांसमोर हे मोठे आव्हान आहे.
अशा प्रकरणांमध्ये पुरावे गोळा करणे, त्यांची शहानिशा करणे आणि न्यायालयात सिद्ध करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. डिजिटल पुराव्यांत छेडछाड होऊ शकते, ते एडिट होऊ शकतात, त्यामुळे त्यांची विश्वसनीयता तपासणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. मात्र, या सगळ्या प्रक्रियेपेक्षा मोठा प्रश्न आहे, तो समाजाच्या शिकण्याचा.
आपण या प्रकरणातून नेमके काय घेत आहोत? जर आपण यातून केवळ कुतूहल आणि मनोरंजन घेतले, तर ही समाजाची हार ठरेल, पण जर आपण यातून नीतिमत्तेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि जबाबदारीचा धडा घेतला, तरच या प्रकरणाला खरा अर्थ प्राप्त होईल. गरज आहे ती अंधश्रद्धेविरुद्ध ठाम भूमिका घेण्याची, पीडितांकडे सहानुभूतीने पाहण्याची, डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःची नैतिकता जपण्याची. 'कुछ डर अच्छे होते हैं' ही ओळ आजच्या डिजिटल युगात अधिकच खरी वाटते. डिजिटल फूटप्रिंट्सची भीतीच अनेकांना चुकीपासून दूर ठेवू शकते.
खरात प्रकरण समाजासाठी इशारा
अशोक खरात प्रकरण हे केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही; तो समाजासाठी एक इशारा, एक आरसा आणि एक कठोर धडा आहे. या घड्याचा आपण किती गंभीरपणे विचार करतो, वावरच भविष्यातील समाजाची दिशा ठरणार आहे. डिजिटल युगात जगताना तंत्रज्ञानाचा वापर करताना विवेक, संवेदनशीलता आणि नीतिमत्ता यांचा समतोल राखणे हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. अन्यथा, डिजिटल सावल्या अधिक गडद होत जातील आणि त्यात अनेकांचे आयुष्य कायमचे हरवेल.