नाशिक : भोंदू खरातचा दिवसागणिक पाय खोलात जाताना दिसत आहे. खरातला रविवारी पाचव्या गुन्ह्यात न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात सायबर टीमला यश आल्याने, खरातची डोकेदुखी वाढली आहे.
खरातच्या मोबाईलमध्ये असलेला डेटा या सर्व प्रकरणात महत्त्वाचा ठरणार असल्याने, सायबर टीमकडून मोबाईलमधील डेटा हस्तगत करण्याचे काम सुरू होते. आता हा डेटा रिकव्हर करण्यात सायबर टीमला यश आले असून, त्यातील कॉल, चॅट आणि व्हिडीओमधून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. खरातच्या संपर्कात अनेक बडे राजकारणी असल्याने, त्यांच्याबाबतची काही माहिती मोबाईलमध्ये आहे काय? याचा देखील शोध घेतला जात आहे.
पेनकिलर खाऊनही डोकेदुखी थांबेना
देवाचा अवतार असल्याचे सांगणारा भोंदू खरात सध्या डोक्याच्या दुखण्याने ग्रस्त असल्याची बाब त्याच्या वकिलाने न्यायालयासमोर आणली आहे. खरातच्या वकिलांनी सांगितले की, खरातच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तसेच त्याचे डोकेही दुखत आहे. दुखणे थांबावे, खांद्याला आराम मिळावा म्हणून त्याने पेनकिलर गोळ्या, तसेच औषधे घेतली; परंंतु त्यामुळेही फरक पडलेला नाही.
बड्या राजकारण्यांचे नंबर कोडवर्डमध्ये
यापूर्वी खरातने त्याच्या मोबाईलमध्ये कोडवर्डमध्ये काही बड्या राजकारण्यांचे नंबर सेव्ह केले असल्याचे समोर आले होते. आता नव्याने हाती लागलेल्या डेटामधून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.