३२ जीबीचे तीन आणि ६४ जीबीचा एक पेनड्राइव्ह
पाच इंच जाडीची प्लास्टिक पत्री, वाघाची बनावट कातडी
ओकस प्रॉपर्टीमधील अभ्यागतांच्या नोंदीचे दोन लाल रजिस्टर
तीन पेनड्राइव्हमध्ये प्रत्येकी १९ फोल्डर्स
सिल्व्हर लॅपटॉप आणि चार्जर
एकूण १६० जीबी डेटा
नाशिक : अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे फासे आता पूर्णपणे उलटले आहेत. त्याच्याकडे असलेल्या डिजिटल उपकरणांमधून खरातचा काळा चेहरा समोर आल्याने, तपास यंत्रणाही हादरली आहे. फॉरेन्सिक तपासणीतून एसआयटीने खरातच्या कृत्याचा १६० जीबी (गीगाबाइट्स) डेटा जप्त केल्याने, खरातचे आणखी कारनामे समोर येण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला पोलिसांना असहकार्य करणारा खरात आता पोपटासारखा बोलत असल्याने, त्याचे धक्कादायक कारनामे दररोज समोर येत आहेत. एसआयटीकडून खरातचा बंगला, ऑफिससह विविध ठिकाणी छापे टाकत सबळ पुराव्यांची जुळवाजुळव केली जात आहे.
खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीमधील दुष्कृत्य कर्मचाऱ्याने सुरुवातीला ६४ जीबी (गीगाबाइट्स) क्षमतेच्या मूळ पेनड्राइव्हमध्ये साठविले होते. त्यानंतर, हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ३२ जीबी क्षमतेच्या अन्य तीन पेनड्राइव्हमध्ये कॉपी-पेस्ट केल्याचे उघड झाले आहे. या चारही पेनड्राइव्हमधील एकत्रित डेटा १६० जीबीच्या आसपास असून, त्यात अनेक महिलांचे शोषण केल्याचे व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, १६० जीबी डेटामध्ये अनेक धक्कादायक बाबी असून, राज्यातील बडी नावे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
एसआयटीने जप्त केलेल्या १६० जीबी डेटामधून खरातचे आतापर्यंतचे सर्वात घाणेरडे सत्य समोर आले आहे. त्याने प्रत्येक पुराव्याला ए, बी, सी असे कोडवर्ड दिले होते. यातील 'ए' हा कोडवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि अत्याचाराचे स्पष्ट संकेत देणारे व्हिडिओ आणि चॅट्स सापडल्याची माहिती समोर येत आहे. हा सर्व डेटा नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या काळातील आहे. याशिवाय खरातच्या अनेक संशयास्पद व्यवहारांचा आणि संवादांचा देखील समावेश आहे.
खरातच्या कार्यालयातून दोन ७० पानी रजिस्टरदेखील जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही रजिस्टरमध्ये भक्तांची नावे, पत्ते आढळले आहेत. खरातकडे येणाऱ्या प्रत्येक महिला आणि पुरुष भक्ताची नोंद डायरीत केली जात असे. एसआयटीने दोन नोंदवह्या जप्त केल्या आहेत. या वह्यांमध्ये समाजातील प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ व्यक्तींची नावे असून, काही गावांच्या नोंदी आढळल्या आहेत. या नोंदवह्यांच्या आधारे आता एसआयटी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण रॅकेटमध्ये अशोक खरातला बनावट खडे (रत्ने) पुरवणारा नाशिकरोड येथील मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित व्यक्ती खरातला पुखराज, माणिक यांसारखी बनावट रत्ने तयार करून देत होता, ज्यांचा वापर करून खरात लोकांची फसवणूक करत असे. पोलीस आता त्याच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.