आषाढीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरे सजली Pudhari Photo
नाशिक

Ashadhi Wari 2024 | आषाढीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरे सजली

शहरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास!' अर्थातच आषाढी एकादशी (Ashadhi Wari 2024) बुधवारी (दि. १७) साजरी करण्यात येणार आहे. या एकादशीनिमित्त शहर व परिसरातील विठ्ठल मंदिरे सजविण्यात आली आहेत. तेथे विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेल्या विहितगाव येथील विठ्ठल मंदिरात आषाढीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरात फुलांची आरास केली असून, विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे. पंचवटीमधील श्रीकाळाराम मंदिर उत्तर दरवाजा, अशोक स्तंभ, जुन्या नाशिकमधील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर, कापड बाजार यांसह शहरातील निरनिराळ्या विठ्ठल मंदिरांत एकादशीचे औचित्य साधत भजन-कीर्तन, हरिपाठ व काकडा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे.

आषाढीनिमित्त उपवासाच्या पदार्थांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी महिला वर्गाने बाजारात गर्दी केली होती. साबुदाणा, भगर, बटाटे, रताळी यांसह वेफर्स, साबुदाणा चिवडा आदी पदार्थांना वाढती मागणी होती. तसेच नागरिकांनी विविध प्रकाराच्या फळ खरेदीला पसंती दिली. किलोभर रताळीकरिता १०० ते १५० रुपये मोजावे लागत असल्याने सामान्यांच्या खिशाचे आर्थिक गणित बिघडले.

पुरातन मंदिरातही तयारी

नाशिकमध्ये अरुणा संगमाजवळ (आताचे रामकुंड) येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरातही आषाढीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. १७५४ मध्ये विश्वनाथ पंचभैये यांनी हे मंदिर उभारल्याचे पुरावे सापडतात. हे मंदिर सध्याच्या चतु:संप्रदाय आखाड्यात असून, काळ्या पाषाणातील ही मूर्ती स्वयंभू व मोठी लोभस आहे. समवेत डाव्या बाजूला रखुमाई असून, उजव्या हाताला भक्त विश्वनाथाची मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम दगडातील असून, आत मानवी स्वरूपातील गरुडाचीही मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर प्रथमदर्शनी ही काळारामाची मूर्ती असल्याचा भास होतो हे वैशिष्ट्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT