नाशिक

Ashadhi Wari 2024 | संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- सनई चौघडे, टाळ मृदुंग अन् विठू नामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीत गुरुवारी (दि.२०) संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढवारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तेव्हा वारी टळलेल्या भाविकांनी, 'एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार..' हा संत तुकारामांचा अभंग गात हात जोडले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. दोन किमी अंतरावर असलेल्या प्रयागतीर्थ पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाडा येथे पालखीची पहिला मुक्काम पडला.

पालखी प्रस्थानाच्या वेळेस पावसाची हजेरी लागली. रिमझिम पावसात प्रस्थान झाले. सर्वत्र आनंदी वातावरण होते. धुक्यात बुडालेला ब्रह्मगिरी लक्ष वेधून घेत होता.

चांदीच्या रथातून पालखी मार्गस्थ

दुपारी ३ वाजेच्या सुमारास संत निवृत्तीनाथ मंदिरात आरती होऊन चांदीच्या रथातून पालखी मार्गस्थ झाली. यावर्षी जवळपास ५० हजारावर वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर केला. सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनीही हजेरी लावत पालखी सहभाग नोंदवला. सुशोभित चांदीच्या रथात संत निवृत्तीनाथांच्या पादुका असलेली पालखी ठेवली होती. मंगलमय वाद्य आणि हरीनामाचा गजर, पालखी पुढे पदन्याय करणारा अश्व, असे भारावून टाकणारे वातावरण होते. नंदकुमार मोरे यांचे मंगल वाद्य लक्ष वेधून घेत होते. पालखी प्रस्थानास माजी नगराध्यक्ष सुनिल अडसरे, बाळासाहेब अडसरे, अजय अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आली आहे. तसेच सचिन शिखरे यांची बैलजोडी सनई पथक घेऊन निघाली. तिर्थराज कुशावर्तावर पूजा झाली.

मनसे अध्यक्ष ठाकरेंचा सहभाग

त्र्यंबकेश्वर येथे पालखी प्रस्थानसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले असता त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात भेट दिली. यावेळी विश्वस्त रुपाली भूतडा यांनी त्यांचा सत्कार केला.

यंदाच्या वारी प्रस्थान सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवर्जुन हजेरी लावली. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. त्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. विश्वस्त मंडळाचा सत्कार घेत पालखी प्रस्थानाला शुभेच्छा देऊन त्यानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

खासदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती

दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालखी प्रस्थानासाठी खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांच्यासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष हभप कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, जीर्णोधार समन्वयक नीलेश गाढवे, पालखी सोहळा प्रमुख नारायण महाराज मुठाळ, प्रसिध्दीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, अॅड. सोमनाथ घोटेकर, माधव राठी, जयंत गोसावी, श्रीपाद कुलकर्णी, राहुल साळुंके यांसह सर्व विश्वस्त तसेच मानकरी बोलापूरकर महाराज, देहूकर महाराज, डावरे महाराज आदींच्या उपस्थितीत मानकरी, विणेकरी यांसह मान्यवरांचा नारळ, प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मागर्दशनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे आणि सहकारी यांनी आपल्या कर्मचार्यांसह सर्व मार्गावर वाहने थांबणार नाही याची दक्षता घेत नियोजन केले होते.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT