निफाड मतदारसंघ विधानसभा 2024 pudhari news network
नाशिक

विधानसभा 2024 | ‘द्राक्ष पंढरी’त काका, अण्णा की 'डार्क हॉर्स'?

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रातील द्राक्ष पंढरी म्हणून आळख असलेल्या निफाड मतदारसंघात जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तशी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असले, तरी मतदारसंघाचा इतिहास आणि सध्याची राजकीयस्थिती पाहता पारंपारिक प्रतिस्पर्धक तथा अजित पवार गटाचे आमदार दिलिपराव बनकर (काका) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल कदम (अण्णा) यांच्यातील सामना पुन्हा पाहावयास मिळेल असे दिसत आहे.

२०१९ मधील निवडणूक चित्र

  • दिलीप बनकर : ९६,३५४

  • अनिल कदम : ७८,६८६

  • यतीन कदम : २४,०४६

येथे शिवसेनेकडून दोनवेळा निवडणून आलेले अनिल कदम हे तिसऱ्यांदा आमदार हाेण्यासाठी कसब पणाला लावताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (अजित पवार गट) दोनदा आमदार होण्याची संधी मिळालेले विद्यमान आ. बनकर पुन्हा मैदानात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. २००९ मध्ये कदम हे शिवसेनेकडून निवडून आले होते. यावेळी त्यांनी बनकर यांचा पराभूत केला होता. त्यानंतर पुन्हा २०१४ मध्ये देखील विजयश्री खेचून आणत सलग दोन टर्म ते आमदार राहिले. मात्र, २०१९ मध्ये कदम यांना बनकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. निवडणुकीत कदम यांचे चुलत बंधू यतीन कदम हे अपक्ष उभे राहिल्याने आणि त्यांना 26 हजार मते मिळाल्याने याचा थेट फटका अनिल कदम यांना बसला होता.

आता अगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार पराभूत झाल्याने भाजप विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेतली जात आहे. यतीन कदम यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा देखील केला जात आहे. या संदर्भात पदाधिकाऱ्यांच्या तीन- चार बैठका देखील झाल्या आहेत. विशेष म्हणजे यतीन कदम यांनी चार-पाच महिन्यात मतदारसंघ पिंजून काढत तरुणांना आपल्या सोबत घेतल्याचे सध्या तरी दिसत आहे. तर महाविकास आघाडीकडून अनिल कदम हे उमेदवार असतील असे मानले जात असले तरी जि. प. माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, दिवंगत आ. मालोजी मोगल यांचे चिरंजीव राजेंद्र मोगल हे देखील शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून पं. स. माजी उपसभापती गुरुदेव कांदे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कांदे यांनी जनसामान्यांचे प्रश्न घेऊन ते सोडविण्याचे काम जोमात सुरू केले आहे. वडील द्वारकानाथ कांदे यांचा देखील त्यांना राजकीय वारसा आहे. ऐनवेळी इतरही अपक्ष उमेदवार मैदानात उतरतील यात शंका नाही.

तिसरा पर्याय कोण?

मतदारसंघातील जनतेने आ. दिलीपराव बनकर आणि माजी आमदार अनिल कदम या दोघांना दोनही प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे आता जनसामान्य जनता या दोघांना टाळून तिसऱ्या उमेदवारांला संधी देणार का? हे देखील पाहणे येणाऱ्या निवडणूक महत्वाचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT