लासलगाव ग्रामपंचायत सरपंच अफजल शेख यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा नवीन सरपंच निवडीचे राजकारण ऐन थंडीमध्ये चांगलेच गरम झाले आहे. सरपंच पद निवडी मध्ये कुठलाही दगा फटका होऊ नये म्हणून सत्ताधारी गटाचे नऊ सदस्य शेजारील जिल्ह्यातील रमणीय ठिकाणी सहलीला गेल्याचे वृत्त आहे. होळकर पाटील गटाकडून योगिता योगेश पाटील आणि दत्ता पाटील यांचे नाव सरपंच पदासाठी चर्चेत आहे. उर्वरित कालावधीसाठी या दोघांचे नाव चर्चेत असले तरी मात्र येणाऱ्या काळात दोघात तिसरा फायदा घेतो की काय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे
होळकर पाटील गटाचे 9 तर माजी आमदार कल्याणराव पाटील आणि डिके जगताप यांच्या गटाचे आठ सदस्य मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते. पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी होळकर गटाचा सरपंच तर उरलेल्या अडीच वर्ष साठी पाटील गटाचा सरपंच असा फॉर्म्युला ठरल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र गेल्या तीन ते साडेतीन वर्षांमध्ये अनेक उलटफेर झाल्याने अनेक राजकीय हेलकावे बघावयास मिळाले. सरपंच पदाचे राजीनामा नाट्य हे संपूर्ण जिल्ह्याने बघितले होते. सरपंच पदाच्या खुर्चीसाठी राज्यातील चार मंत्र्यांनी हस्तक्षेपाची घटना प्रथमच लासलगावच्या राजकारणात पाहायला मिळाली. यात होळकर गटाला सरपंच पद टिकवण्यात यश मिळत अफजल शेख यांच्या रूपाने सरपंच होण्याचा मान मिळाला होता. आता शेख यांनी रोटेशन पद्धतीने सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने 16 जानेवारी रोजी लासलगाव ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच निवडीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सरपंच पदाची माळ दत्ता पाटील की योगिता पाटील यांच्या गळ्यात पडते ? किंवा दोघात तिसऱ्या नावाची चर्चा होते ते निवडणूक नंतर स्पष्ट होणार आहे