नाशिक : जिल्ह्यात अपार आयडीचे 51 टक्के काम पूर्ण झाले असून, 5 हजार 581 शाळांमधील 12 लाख 68 हजार 174 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 47 हजार 645 विद्यार्थ्यांचे अपार आयडीचे काम पूर्ण झाले आहे. अपार आयडी नोंदविण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असून, अखेरच्या दोन दिवसांत उर्वरित 50 टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान शालेय यंत्रणा आणि शिक्षण विभागापुढे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंंत्रालयाने ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री) आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. आयडीमुळे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार आहे. या आयडी क्रमांकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असून, पाहिजे तेव्हा ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यामुळे एका महिन्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाल्या आहेत.
30 नोव्हेंबरपर्यंत अपार आयडीचे काम पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या दोन दिवसांत शिक्षण विभाग, गटस्तरीय अधिकारी, विस्तार अधिकारी यांना जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना भेटी देऊन अपार आयडीच्या कामकाजासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आज आणि उद्या शालेय स्तरावर अपार आयडीच्या कामकाजाचा यंत्रणेकडून आढावा घेण्यात येणार आहे.
अपार आयडी ओपन करण्यासाठी 30 नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदत असल्याने अखरेच्या दोन दिवसांत उर्वरित 49 टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी उघडण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. शासनाने अखेरच्या दोन दिवसांत अपार सप्ताह राबविण्याच्या सूचना दिल्या असून, याअंतर्गत शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी येणार्या अडचणी सोडविण्यास शिक्षण विभागाला शासनाकडून सांगण्यात आले आहे.