Ashok Kharat Case | 
नाशिक

Ashok Kharat Case | महिलेचा आत प्रवेश अन् लगेचच झुंबरचा लाईट बंद!

भोंदू खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना जाळ्यात ओढणार्‍या अशोक खरात याच्या कुकर्मांची नवी पंचसूत्री समोर आली आहे. महिलांचे मानसिक व शारीरिक शोषण करण्यासाठी त्याने सुनियोजित पद्धतीचा वापर केल्याचे तपासातून उघड झाले आहे. त्याच्या कार्यालयातील झुंबर हा कोडवर्ड असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. महिला आत नेल्यानंतर झुंबरचा लाईट बंद करणे म्हणजे आत कुणालाही प्रवेश नाही, असा संकेत कर्मचार्‍यांना दिला जात होता.

तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो एका ठरावीक पंचसूत्रीचा वापर करत होता. खरात सुरुवातीला त्याच्याकडे येणार्‍या व्यक्तींची जन्मतारीख विचारून त्यांचा जन्मवार अचूक सांगायचा. यामुळे तो अत्यंत ज्ञानी असल्याचा आभास निर्माण होत असे. त्यानंतर तो विशेषतः महिलांची सहानुभूती मिळवण्यावर भर देत असे. पती-पत्नी एकत्र आल्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यात संशय निर्माण करून वाद निर्माण करणे ही त्याची पुढील पायरी होती. काही प्रकरणांमध्ये तो कुटुंबातील सदस्यांमध्ये अविश्वास निर्माण करत असे.

न्यायालयात सादर करणार

खरात याची पोलिस कोठडी रविवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत असून, तपासाला अधिक गती मिळाली आहे.

‘आमची जमीन परत द्या’

खरातचा पाय खोलात चालला असून, आता त्याला मंदिर आणि फार्म हाऊससाठी जमीन विकणारे माळी बंधू पुढे आले आहेत. खरातने भीती दाखवून जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करत आमची जमीन परत द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अंगठ्या विकून व्यावसायिकाला गंडा

अहिल्यानगर : भोंदू अशोक खरात हा केवळ महिलांचेच लैंगिक शोषण करत नव्हता तर चारसोबीसी करुन लोकांची फसवणूक करीत होता. नेवासा येथील व्यावसायिकाला व्यवसायाच्या बरकतीसाठी वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कसून चौकशी सुरू असून, खरातचा पाय आणखी खोलात अडकण्याची शक्यता आहे.

भोंदू खरातच्या सल्ल्याने जिल्हा बँकेचे स्थलांतर!

नाशिक : कोट्यवधी रुपये खर्चून द्वारका येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अद्ययावत इमारत बांधण्यात आली. मात्र, अचानकच काही वर्षांपूर्वी बँकेचे कामकाज सीबीएस येथील इमारतीत हलवले गेले. वास्तविक, द्वारका येथील बँकेचे ठिकाण मोक्यावर व ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांसाठी सोयीचे होते. मात्र, भोंदू अशोक खरातच्या या सल्ल्याने बँकेचे कामकाज हलविण्यात आल्याचा संशय महाराष्ट्र ‘अंनिस’च्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT