Ankai Tankai Fort Yeola 
नाशिक

Ankai Tankai Fort Yeola | पावसाळ्यात हिरवाईने नटले अंकाई-टंकाई किल्ले; येवला तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी!

Ankai Tankai Fort Yeola | अंकाई-टंकाई किल्ल्यांची पर्यटकांना भूरळ

पुढारी वृत्तसेवा

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील शिवलिंग आकाराचे अंकाई-टंकाई किल्ले सध्या पर्यटकांना भूरळ घालत आहेत. पावसामुळे हिरवाईने नटलेल्या या किल्ल्यांकडे सध्या पर्यटकांचा ओढा वाढला आहे. हे किल्ले मनमाडजवळ असून, दोन भव्य डोंगर खांद्याला खांदा लावून उभे आहेत. पावसाळ्यात किल्ल्यावर निसर्गसौंदर्य खुलले आहे. उंच आणि सपाट असे देखणे किल्ले असल्याने दूरून पाहिल्यावर जणू सह्याद्रीचे दोन अभेद्य पहारेकरी उभे आहेत असे दिसते.

अंकाई आणि टंकाई किल्ले हे प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेले दुर्ग अनेक राजवटींचे साक्षीदार राहिले आहेत. इतिहासात सातवाहन काळापासून या परिसराला विशेष महत्त्व होते. पुढे यादव, बहामनी, निजामशाही, मुघल आणि मराठे अशा अनेक सत्तांनी या किल्ल्यांचा वापर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही या परिसराचे सामाजिक महत्त्व कायम होते. गडावर जाणाऱ्या पायऱ्या आजही भक्कम अवस्थेत आहेत.

वाटेत पायथ्याशी डोंगरात कोरलेल्या प्राचीन जैन लेण्या, पाण्याच्या टाक्या आणि विशाल दरवाजे पाहायला मिळतात. चांदवडच्या विस्तीर्ण डोंगररांगा आणि मनमाडचा भाग एका नजरेत दिसतो. म्हणूनच शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड अत्यंत उपयुक्त मानला जात असे.
आज अंकाई-टंकाई महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात आपली कला आणि सह्याद्रीच्या भागाचा जिवंत पुरावा आहे.

श्रावण महिन्यात अंकाई गावात दर सोमवारी यात्रा भरत असून, किल्ल्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. किल्ल्यावर अगस्ती ऋषी, बालाजी व मोठ्या बाबाची दर्गा आहे. येवला तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी परिसरातील दिंड्या या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या किल्ल्यावरून मनमाड - पुणे रेल्वेमार्ग तसेच मनमाड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेलाईन जात असून, हा परिसर अतिशय देखणा आहे. पावसाळ्यात हिरवळीने नटलेले हे किल्ले पर्यटकांसाठी फोटो व सेल्फी पॉइंट ठरत आहेत.

अशी आहेत वैशिष्ट्ये

या किल्ल्यांचे बांधकाम साधारण ८ ते ९ व्या शतकात राष्ट्रकूटकालीन असल्याचे मानले जाते. जुना सुरत-औरंगाबाद व्यापार मार्ग येथूनच केला जायचा. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ६९० मीटर आहे. अंकाई पूर्वेकडील किल्ला असून इथे गणेश मंदिर, बारव, पाण्याची टाकी आहेत. तर टंकाई पश्चिमेकडील किल्ला असून, इथे जैन लेणी आणि मूर्ती आहेत. दोन्ही किल्ल्यांमध्ये मधोमध दरी आहे आणि खाली जोडणारा रस्ता आहे. १२ मोठे बुरुज आणि मजबूत तटबंदी आजही शाबूत आहेत. किल्ला पायांनी चढण्यासाठी सुमारे १ तास लागतो. शिड्या आणि कोरलेल्या पायऱ्या आहेत. मात्र, पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या होतात.

"अंकाई-टंकाई हे दोन जुळे किल्ले आहेत आणि मनमाडपासून सात किलोमीटर अंतरावर असून, दोन्ही एकाच डोंगरावर पण वेगळ्या टोकाला आहेत. पर्यटकांची श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. भाविकही दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. किल्ल्यावर सोयी-सुविधा होत आहेत."
— राजेंद्रसिंग परदेशी, रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT