मालेगाव : सीताईनगर येथील भूमिगत गटाराचे चेंबर चोकअप झाल्याने रस्त्याच्या कडेला साचलेले सांडपाणी 
नाशिक

Nashik AMRUT project leakage | प्रकल्प पूर्णत्वापूर्वीच 'अमृत'ला गळती

AMRUT Project Leakage Soygaon- 500 कोटींचा खर्च वायाः भुयारी गटारांमुळे सोयगावात सांडपाणी रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उघड्या गटारांमुळे होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेंतर्गत सुमारे 500 कोटी रुपयांचा भुयारी गटार प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच सोयगावसह काही भागांत गटार पाइपलाइन चोकअप होणे, चेंबरमधून सांडपाणी ओव्हरफ्लो होणे आणि रस्त्यांवर मैलायुक्त पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या काही पाइपलाइनची क्षमता अपुरी असल्याने सांडपाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत काम सुरू असतानाच सूचना आणि आक्षेप नोंदविण्यात आले होते, मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. भुयारी गटारासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे अनेक भागांतील रस्ते अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धूळ, खड्डे आणि वाहतुकीच्या समस्यांबरोबरच आता सांडपाणी साचण्याच्या नव्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

सोयगाव गावठाण परिसरातील सीताईनगर भागात भुयारी गटाराच्या चेंबरमधून सांडपाणी बाहेर पडून रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत साचत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ परिसरातील नागरिक आणि रहिवाशांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे.

काही भागांत चेंबर आणि पाइपलाइन तुंबल्यानंतर तातडीने दुरुस्ती झाली नसल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी वर्गणी गोळा करून खासगी मजुरांच्या मदतीने साफसफाई आणि दुरुस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प सुरू असताना नागरिकांनाच अशा कामांसाठी पुढाकार घ्यावा.

योजना अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

सांडपाण्यावर प्रक्रिया करून शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अमृत 2.0 योजनेत सुरुवातीलाच तांत्रिक त्रुटी आणि देखभालीच्या समस्या समोर आल्यामुळे तिच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन आणि कंत्राटदार कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

आमच्या घरासमोर चोवीस तास सांडपाणी वाहात आहे. दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नाही. मग आम्ही कर कशासाठी भरायचा?

- लताबाई शिरसाट, रहिवासी, सीताईनगर

भुयारी गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे असून, प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच समस्या निर्माण होत असतील, तर पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कंत्राटदाराकडून दोष दूर करून घ्यावेत.

- विजया सैंदाणे, रहिवासी, सीताईनगर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT