नाशिक : केंद्राच्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सात रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यात नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, लासलगाव, मनमाड, नगरसूल, नांदगाव या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रेल्वे मंत्रालयातर्फे 'अमृत भारत स्टेशन' योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत देशभरातील एकूण 1,309 रेल्वे स्थानकांचा आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या रेल्वे प्रवासात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत प्रत्येक स्थानकाच्या दीर्घकालीन गरजा आणि तेथील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन एक मास्टर प्लॅन तयार केला जाईल. त्यानंतर रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जाईल. या योजनेत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, लासलगाव, मनमाड, नगरसूल, नांदगाव स्थानकांचा समावेश आहे. या योजनेमुळे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी वेटिंग लाउंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३,७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अहिल्यानगर (३१ कोटी), धुळे (९.५ कोटी), लासलगाव (१०.५ कोटी), मनमाड (४५ कोटी), नगरसूल (२०.३ कोटी), नांदगाव (२० कोटी), चाळीसगाव (३५ कोटी), अंमळनेर (२९ कोटी), धरणगाव (२६ कोटी), पाचोरा जं. (२८ कोटी), देवळाली (१०.५ कोटी), इगतपुरी (१२.५ कोटी).
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेली १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे नाशिकसह राज्याचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होईल.
रेल्वे स्थानकांची रचना, प्रवेशद्वार आकर्षक करणार
स्थानकांमध्ये वेटिंग हॉलसोबतच कॅन्टीन आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारणार
प्रत्येक स्थानकात 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट'चे दोन स्टॉल्स
स्थानकात बिझनेस मीटिंगसाठी आरामदायी लाउंज उभारणार
स्थानकात सर्वत्र सोप्या भाषेतील होर्डिंग्ज आणि साइन बोर्ड लावणार
लिफ्ट, स्वयंचलित मार्ग, पार्किंग आणि प्रकाश व्यवस्था यांची उत्तम व्यवस्था केली जाईल.
स्थानकात स्थानिक कला दर्शविणारी छायाचित्रे आणि कलाकृती लावणार
प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय सुविधा देणार
वेटिंग हॉल, प्लॅटफॉर्म, रिटायरिंग रूम आणि एस्कलेटर बसविणार
सार्वजनिक घोषणा प्रणाली सुधारली जाईल.