नाशिक : केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह येत्या बुधवारी (दि. २५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार, पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. विधानसभा मतदारसंघांचा आढावाही शाह यावेळी घेणार असल्याचे वृत्त आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. राज्यातील ४८ पैकी जेमतेम ९ जागा भाजपला मिळू शकल्या. केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या या पराभावाची गंभीर दखल घेतली आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये याची दक्षता आता थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतली जात आहे. त्यादृष्टीने निवडणूक व्यूहरचनेची आखणी भाजपकडून केली जात आहे. संघटनात्मक पातळीवर या निवडणुकांसाठी बूथ पातळीपर्यंतची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. भाजप महायुतीतल्या घटक पक्षांसोबतच निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी आता महायुतीच्या घटक पक्षांसोबत जागा वाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी दोनच जागांवर भाजपला यश आले आहे. त्यामुळे संघटनेच्या आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः नाशिकमध्ये येऊन उत्तर महाराष्ट्रातील जागांचा आढावा घेणार आहे. २५ सप्टेंबर रोजी शाह नाशिकमध्ये येऊन पक्षाचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत संवाददेखील साधण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी (दि.२५) उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या पाच जिल्ह्यांतील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार या बैठकीची तयारी सुरू आहे.- प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप