रुग्णवाहिकाचालक सागर सोळसे. 
नाशिक

Ambulance driver hero | रुग्णवाहिकाचालक नव्हे, तर साक्षात देवदूत!

मृत्यूच्या महामार्गावर 'नवजीवन' देणारा सागर सोळसे

पुढारी वृत्तसेवा

येवला : जेव्हा मध्यरात्री संपूर्ण जग गाढ झोपेत असते, रस्ते ओस पडलेले असतात आणि महामार्गावर फक्त काळाकुट्ट अंधार असतो... नेमक्या त्याच वेळी, त्याच अंधारात काळाशी झुंज देणाऱ्या निष्पाप जखमींसाठी एक माणूस 'रखवालदार' होऊन धावतोय. येवला तालुक्यातील अंदरसूल येथील रुग्णवाहिकाचालक सागर सोळसे. गेली अनेक वर्षे महामार्गावर मृत्यूच्या दाढेतून अनेकांना सुखरूप बाहेर काढणारा सागर आज कित्येक कुटुंबांसाठी आशेचा किरण झालेला आहे.

आणखी उशीर झाला असता, तर...

नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात सागर यांच्यातील माणुसकीचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्यांनी केवळ जखमींना गाडीतून बाहेर काढले नाही, तर रुग्णवाहिकेत डॉक्टरांच्या आधी स्वतः जखमींच्या जखमांवर हात ठेवून रक्तस्राव थांबवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनीही भावुक होऊन सांगितले, जर या रुग्णांना आणायला आणखी १० मिनिटे उशीर झाला असता, तर कदाचित ते वाचले नसते.

सागर यांनी वेळेवर आणले म्हणूनच आज हे प्राण २ वाचले. नातेवाइकांचे अश्रू आणि कृतज्ञता आज त्या जखमींच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत पण हे अश्रू दुःखाचे नसून, कृतज्ञतेचे आहेत. एका नातेवाइकाने हात जोडून हुंदका दाबत सांगितले की, तो आमच्यासाठी केवळ रुग्णवाहिकाचालक नाही, तर आमच्या माणसाला मृत्यूच्या दारातून परत आणणारा साक्षात देवदूत आहे. दिवस असो वा रात्र, प्राणाची पर्वा न करता निःस्वार्थ मनाने सेवा करणाऱ्या या 'अवलिया' रुग्णवाहिकाचालकाला संपूर्ण परिसराकडून मानाचा मुजरा केला जात आहे.

अपघातानंतरचा प्रत्येक सेकंद मोलाचा ● असतो. डोळ्यांदेखत माणूस रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडतो. अशा वेळी माझ्या जिवाची भीती वाटत नाही. घरी माझेही कुटुंब माझी वाट पाहात असते, हे खरे आहे पण समोर कोणाचा तरी जीव जात असताना मला माझे घर आठवत नाही. समोरच्याच्या कुटुंबाचा कुलदीपक विझू नये, हीच माझी एकमेव प्रार्थना असते.
- सागर सोळसे, रुग्णवाहिकाचालक

जेव्हा नेटवर्कही साथ सोडते...

रात्रीच्या वेळी महामार्गावर अपघात झाला की, परिस्थिती भीषण होते. मोबाइलला नेटवर्क नसते, आजूबाजूला मदतीला कोणी नसते. अशा अत्यंत बिकट आणि घाबरवून सोडणाऱ्या परिस्थितीत सागर सोळसे हे देवदूतासारखे पोहोचतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना स्वतःच्या हाताने उचलतात त्यांना धीर देतात आणि स्वतःची रुग्णवाहिका वाऱ्याच्या वेगाने रुग्णालयाकडे पळवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT