Nanded MIDC pudhari photo
नाशिक

Ambad MIDC News | गस्तीमुळे औद्योगिक वसाहतीत आठ दिवसांत चोरी नाही

Ambad MIDC News | दिवाळी सुटीनंतर कारखान्यांतील यंत्रांचा खडखडार सुरू; एमआयडीसी आजपासून पुन्हा गजबजणार

पुढारी वृत्तसेवा

सिडको (पुढारी वृत्तसेवा):

दिवाळी सुटीनंतर अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योग पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू होत असून, रविवारपासून कारखाने व कंपन्यांमध्ये उत्पादन प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. मागील रविवारी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बहुतांश उद्योगांनी दिवाळीची सुटी जाहीर केली होती. त्यानंतर शनिवारी औद्योगिक वसाहतीत नियमित साप्ताहिक सुटी असल्याने सलग आठ दिवस अनेक कारखाने बंद राहिले होते.

त्यामुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात शांतता होती, परंतु पोलिसांच्या दिवसरात्र गस्तीमुळे दिवाळीत एमआयडीसीमध्ये चोरीचा एकही प्रकार घडला नाही. आज रविवारपासून उद्योग होत असल्याने अंबड एमआयडीसीत पुन्हा एकदा कामगार, अधिकारी, कर्मचारी आणि मालवाहू वाहनांची वर्दळ वाढणार आहे.

कारखान्यांतील यंत्रांचा खडखडार सुरू होऊन उत्पादनाला वेग मिळणार आहे. दिवाळीनंतर नवीन ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी अनेक उद्योगांनी उत्पादन वाढवण्याचे नियोजन केले आहे.
दिवाळीच्या सुट्टीच्या काळात बंद असलेल्या कारखान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

दिवसा तसेच रात्र नियमित गस्त वाढवून औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या या दक्षतेमुळे संपूर्ण आठ दिवसांच्या कालावधीत कोणत्याही कंपनीत किंवा कारखान्यात चोरी अथवा अन्य अनुचित प्रकार घडल्याची नोंद झालेली नाही.

औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेचे स्वागत केले असून, वाढीव गस्तीमुळे उद्योग परिसर सुरक्षित राहिल्याची भावना व्यक्त केली आहे. आता दिवाळी सुटी संपल्यानंतर अंबड औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा उत्पादनाला गती मिळणार असून, परिसरात पूर्वीप्रमाणे औद्योगिक चैतन्य निर्माण होणार आहे.

"दिवाळी सुटीनंतर अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखाने व कंपन्या रविवारपासून सुरू होत आहेत. सुटीच्या काळात कोणत्याही कारखान्यात चोरी झाल्याची माहिती मिळालेली नाही. एमआयडीसी पोलिसांच्या विशेष गस्तीबद्दल त्यांचे विशेष आभार."
- राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा
"दिवाळी सुट्टी काळात अंबड औद्योगिक वसाहतीत शांतता होती. दिवसा व रात्री विशेष गस्त असल्याने आतापर्यंत कोणत्याही कंपनीत चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही."
- संतोष नरुटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT