नाशिक : सतिश डोंगरे
साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला सोने-चांदीसह अन्य वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने, या दिवशी खरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. तसेच या दिवशी घरोघरी आमरस-पुरणपोळीचा बेतही आखला जात असल्याने, सध्या बाजारात १२ प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आवाक वाढल्याने फळांचा राजा असलेला हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने, अक्षयतृतीयेचा गोडवा वाढणार आहे.
नाशिकच्या बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात आंबे दाखल झाले आहेत. रमजान ईद संपताच हापूस बाजारात दाखल झाला असला तरी, प्रारंभी १४०० ते १८०० रुपये डझनने त्याची विक्री होऊ लागल्याने, सर्वसामान्यांच्या तो आवाक्याबाहेर होता. आता हापूसची आवक वाढल्याने, तसेच इतरही आंबे दाखल होऊ लागल्याने, हापूसच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत.
नाशिक शहरात ६०० ते ८०० रुपये डझनप्रमाणे हापूस आंबा मिळू लागल्याने, अक्षयतृतीयेला घरोघरी हापूस आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा बेत रंगणार आहे. सध्या नाशिकच्या बाजारपेठेत देवगडच्या हापूससह, रत्नागिरीचा केशर, गुजरातचा आम्रपाली, हैदराबादचा मल्लिका आदी प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. आवक वाढल्याने दरही कमी झाले आहेत. यंदा अवकाळीचा फारसा फटका बसला नसल्याने, आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. परिणामी, यंदा अक्षयतृतीया अगोदरच दर आवाक्यात आल्याने सर्वसामान्यांना आंब्याचा गोडवा मनसोक्त चाखणे शक्य होणार आहे.
आंबा दर असे...
रत्नागिरी हापूस : २२० रु.
देवगड हापूस : २४० रु.
जुनागड केशर : २२० रु.
रत्नागिरी केशर : २०० रु.
बंगलोर लालबाग : १२० रु.
विजयवाडा बदाम : १४० रु.
आम्रपाली गुजरात : १५० रु.
हैदराबाद मल्लिका : १५० रु.
रत्नागिरी पायरी : १२० रु.
हिमायत : ११० रु.
दशहरा बेगनपल्ली : १४० रु.
लंगडा : ११० रु.
अक्षयतृतीयेला पितरांची पूजा केली जाते. पूजेसाठी आवश्यक साहित्यानेही बाजारपेठ सजली आहे. घागर (करा-केळी) खरेदीला नागरिकांकडून गर्दी केली जात असून, शंभर रुपये प्रतिनग याप्रमाणे घागर विक्री होत आहे. याशिवाय खरबूजही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहेत. पूजेसाठी टरबूज आणि खरबूज यांचा वापर केला जातो.
आंबा पिकाला यंदा अवकाळीचा फारसा फटका बसला नसल्याने, उत्पादन चांगले आले. बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर आटोक्यात आहेत. पुढच्या १५ दिवसांनंतर दरांमध्ये आणखी मोठी कपात होऊ शकते.नशीम शेख, आंबे विक्रेता, नाशिक.