नाशिक : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडला अटक झाली आहे. वाल्मीक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आरोप करत मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरले असतानाच, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. सिंचन घोटाळ्यावरून माझ्यावरही आरोप झाले होते. त्यावेळी मला सहन न झाल्याने मी राजीनामा दिला होता. राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडेंनी ठरवावे. आरोप सिद्ध झाला, चौकशीही त्यांच्यापर्यंत पोहचली तर राजीनामा घेऊ, अशा शब्दांत पवारांनी त्यांची पाठराखणही केली. तसेच बीड प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री पवार रविवारी (दि. 16) विविध विकासकामांनिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात विविध विषयांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सांगितले आहे की, जी घटना बीडला घडली, ती अतिशय निंदनीय, माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील, त्यांना शासन केले जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्वरित एसआयटी, सीआयडी नेमली आहे. न्यायालयीन चौकशीदेखील सुरू आहे. एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्येही नाव आले, तर आपण कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा मी राजीनामा दिला होता. मी स्वच्छ पद्धतीने काम केले होते. मी गेल्या 34 वर्षांपासून अनेक खाती सांभाळली आहेत. 1992 सालापासून आजपर्यंत काम करताना मलादेखील बदनाम करण्यात आले. माझी जनमानसात प्रतिमा मलीन करण्यात आली. त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटले की, आपण इतक्या व्यवस्थित काम करत असताना आरोप होत आहेत. त्यानंतर मी राजीनामा दिला होता, तर काही जणांवर न्यायालयाने ताशेरे ओढले, तरी काही नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. लाल बहादूर शास्त्री केंद्रीय रेल्वेमंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मात्र रेल्वेचे किती अपघात झाले, काेणत्या मंत्र्याने राजीनामा दिला, आदर्श प्रकरण, २६/ ११ चा अतिरेकी हल्ला अशी किती तरी प्रकरणे घडली, कोणी- कोणी राजीनामे दिले असा प्रश्न उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित केला. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाही? असे विचारले असता, उपमुख्यमंत्री पवार यांनी, हा प्रश्न आपण धनंजय मुंडे यांनाच विचारा, त्यांचे म्हणणे आहे की, यात माझा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनीही सांगितले, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही. आम्हाला कोणाला वाचवविण्यासाठी जनतेने 237 आमदार निवडून दिलेले नाहीत. आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्या पद्धतीने आम्ही चांगले काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.