आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सिन्नरमधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची ऑफर दिली. File Photo
नाशिक

Ajit Pawar | माणिकरावांच्या ऑफरला अजितदादांची ना !

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सिन्नरमधून विधानसभेची निवडणूक लढविण्याची ऑफर दिली. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या या ऑफरची नाशिकसह राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून भूमिपूजने, उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून झालेल्या काही विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पणाचा कार्यक्रम उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील पंचाळे येथे झाला. यावेळी दोन्ही नेत्यांची भाषणे चर्चेचा विषय ठरली.

राज्याच्या राजकारणात धडाकेबाज नेता म्हणून आमदार कोकाटे यांची प्रतिमा आहे. स्पष्टवक्तेपणा हादेखील त्यांचा स्वभावगुण आहे. त्यामुळे मेळाव्याच्या निमित्ताने भाषण करताना आमदार कोकाटे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. गेल्या २० वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मिळू शकला नाही तेवढा विकास निधी अवघ्या दोन वर्षांच्या काळात मिळाल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. केवळ अजितदादांच्या सोबत गेल्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगतानाच कोकाटे यांनी दादांना सिन्नरमधून उमेदवारीची ऑफर दिली. लाख-दीड लाखाच्या फरकाने तुम्हाला निवडून आणू, अशी ग्वाही देताना जर तसे झाले नाही तर मुंबईचे तोंड पाहणार नाही, अशी आणही घेतली. तथापि, ऑफर चांगली आहे. मात्र मी घरच्या (बारामती) मंडळीतच रमतो, असे म्हणत अजित पवारांनी या ऑफरला नम्रपणे नाकारले आणि येत्या निवडणुकीत आमदार कोकाटे यांनाच मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन उपस्थितांना केले.

लावली पठ्याने कुस्ती...

माणिकरावांच्या ऑफरवर बोलताना अजित पवारांनी इकडे माणिकरावांना जास्त मताधिक्क्याने निवडता की, मी बारामतीतून जादा मताधिक्क्याने विजयी होतो, हे मला बघायचे आहे, असे नमूद करीत 'पठ्याने कुस्ती लावली..' अशी घोषणा केली. त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार कोकाटेंना मंत्रिपदाची मागणी केली. त्यावर हजरजबाबी अजितदादांनी ते माझ्या हातात आहे, तुम्ही काळजी नका करू, असा शब्द दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT