नाशिक : ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक (कार्गो) सेवेने 'टेकऑफ' घेतला आहे. पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान विमानतळावरून तब्बल ४०४८ मेट्रिक टन इतकी निर्यात करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत अडीच पट अधिक ही निर्यात असून, द्राक्षे, कृषी उत्पादने, कुक्कुटपालन, संरक्षण आणि औद्योगिक वस्तू, औषधे आदींची निर्यात करण्यात आली आहे.
कार्गो निर्यात हाताळण्यासाठी एचएएल व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी मिळून हालकॉन ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून विमानाद्वारे मालवाहतूक निर्यातीचे व्यवस्थापन केले जाते. ओझर विमानतळावरून २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४१०१ मेट्रिक टन निर्यात २५० विमान उड्डाणांद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर हालकॉनने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सात हजार मेट्रिक टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी पहिल्या सहामाहीतच ४०४८ मेट्रिक टन इतकी निर्यात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १५१९ मेट्रीक टन इतकी निर्यात करण्यात आली आहे. तुलनेत यंदा त्यात तब्बल अडीचपट वाढ झाली आहे. २२९ मालवाहू उड्डाणांद्वारे ही निर्यात करण्यात आली आहे.
मागील वर्षी याच कालावधीतील ९१ मालवाहू उड्डाणांच्या तुलनेत ही वाढ अडीचपटीपेक्षा अधिक आहे. हालकॉनने मागील आर्थिक वर्षात (२०२४-२५) ४१०१ मेट्रिक टन निर्यात २५० विमान उड्डाणांद्वारे हाताळली गेली. हालकॉनने गेल्या आर्थिक वर्षात हाताळलेली आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक यंदा पहिल्या सहामाहीतच गाठली आहे. म्हणजे हालकॉनने यंदाचे ७ हजार मेट्रिक टन उद्दिष्टाच्या ५७ टक्के निर्यात पहिल्या सहामाहीत हाताळली आहे.
मुंबईच्या तुलनेत स्वस्त मालवाहतूक
ओझर विमानतळावरून होणारी मालवाहतूक मुंबई विमानतळाच्या तुलनेत स्वस्त आहे. येथून कमी शुल्क आकारले जात असल्याने, बाहेरील निर्यातदार नाशिकच्या ओझर विमानतळावरून मालावाहतूक निर्यातीला प्राधान्य देतात. नाशिकमधून कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, कुक्कुटपालन, अभियांत्रिकी आणि इतर विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी प्रचंड क्षमता आहे.