सिडको (नाशिक): पर्यावरणपूरक प्रदर्शन हे आयमा प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असून, प्रदर्शनातील एक डोम डिझेलऐवजी पूर्णपणे बॅटरीवर आधारित असल्याची माहिती आयमाच्या हरित ऊर्जा विकास समितीचे चेअरमन वेदांत राठी यांनी दिली. दरम्यान लोकांना हरित ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी (दि. ३०) सकाळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महाप्रीतचे मुख्य महाव्यवस्थापक परेश शेठ यांचे डोम टू मध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आयमाने विविध पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून दोन पैकी एक डोम पूर्णपणे बॅटरीवर आधारित आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद वाटतो. लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा पुरस्कार करावा, याचा आम्ही सातत्याने प्रचार व प्रसार करीत आहोत. लोकांनी कमी मायक्रोनच्या प्लास्टिकचा तसेच प्लास्टिक बॉटलचा वापर टाळावा याबाबत आम्ही जनतेचे प्रबोधन करत असून, प्लास्टिकचे मशीनद्वारे रिसायकलिंग कसे करता येते, याचे प्रात्यक्षिकही आम्ही डोम टू मध्ये दाखवित आहोत. तसेच तेथे पर्यावरणपूरक असे स्टार्टअपही आहेत. त्यात बंगळुरूच्या उरावूसह मुंबईच्या कंपन्यांचाही समावेश आहे, असेही राठी यांनी नमूद केले.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आयमाने व्यापक पावले उचलली असून, आयमा राइज (आयमा रिस्पॉन्सिबल इंडस्ट्रीज सस्टेनेबल एनर्जी) नावाचा मंच उभारला असून, नाशिकच्या सात नामांकित कंपन्या म्हणजे वृषभ इन्स्ट्रुमेंट, एबीबी, बॉश, डब्ल्यूआरएस एनर्जी, इनोवा रबर्स, श्यामला इलेक्ट्रो प्लेटर्स, डीजीओ एलएलसी आदी कंपन्या त्याच्या संस्थापक आहेत. विशेष म्हणजे या सर्व कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये पर्यावरणपूरक म्हणजे सोलर एनर्जी, पाणीप्रक्रिया योजना, विजेचा कमीत कमी वापर यावर विशेष भर दिला आहे, याची आठवणही राठी यांनी करून दिली.