नाशिक : शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अनुदानित आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अनुदानित आश्रमशाळांची बिंदू नामावली (रोस्टर) तातडीने अद्ययावत करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांचे रोस्टर पडताळणीसाठी दि. ५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे, तर दि. १० जुलैपर्यंत मागासवर्गीय कक्ष येथे बिंदू नामावली (रोस्टर) मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यापूर्वी बिंदू नामावलीची पडताळणी करून ती अद्ययावत करणे कायदेशीररीत्या आवश्यक असते. याबाबत आदिवासी विकास आयुक्तस्तरावरून यापूर्वीच नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, बिंदू नामावली (रोस्टर) अद्ययावत करण्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री डॉ. उईके यांनी अनुदानित आश्रमशाळा रोस्टर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, अनुदानित आश्रमशाळा रोस्टर पडताळणी मोहिमेची जबाबदारी अपर आयुक्त कार्यालयांवर असणार आहे. तसेच, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने आदिवासी विकास आयुक्तालयाला सादर करण्याचे निर्देश मंत्री डॉ. उईके यांनी दिले आहेत.
विशेष कॅम्पचे आयोजन
अनुदानित आश्रमशाळांचे बिंदू नामावली अर्थात रोस्टर अद्ययावत करण्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयस्तरावरून विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. या कॅम्पच्या माध्यमातून रोस्टर पडताळणी व इतर आनुषंगिक कामांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे रोस्टर पडताळणी विहित मुदतीत पूर्ण होणार आहे.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ५५८ अनुदानित आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरणे, हे आमचे प्राधान्य आहे. परंतु, कोणतीही भरती प्रक्रिया कायदेशीर चौकटीत आणि आरक्षण नियमांचे पालन करूनच होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांच्या रोस्टर पडताळणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानित आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल.
- लीना बनसोड (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)