सतीश डोंगरे
नाशिक : चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनविश्रामगृह येथे एक वाघ तेथील एका व्यक्तीवर हल्ला करतो. त्याच्या नरडीचा घोट घेत, तिला फरपटत नेतो. पुन्हा काही क्षणांत त्याला त्याच ठिकाणी घेऊन येतो अन् त्याला पाणीही पाजतो, असे दोन व्हिडीओ समोर आले अन् अनेकांच्या काळजात धस्स झाले. व्हिडीओ इतके हुबेहूब होते की, वनविभागाला ते व्हिडीओ एआयनिर्मित असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानंतर लोकांमध्ये एआय डीपफेक व्हिडीओच्या फेकाफेकीची एकच चर्चा रंगली. मात्र, हे व्हिडीओ म्हणजे गंडवण्याचा नवा फंडा असून, सद्सद्विवेक बुद्धीचा वापर हाच यातून बचावाचा मार्ग असल्याचे एआय तज्ज्ञ सांगतात.
भारतासह संपूर्ण जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मोठा गाजावाजा होत आहे. एकीकडे एआयचे भरमसाठ फायदे सांगितले जात असताना, तुलनेत तितकेच तोटेही समोर येत आहेत. प्रारंभी व्हाइस क्लोनिंग हे एआयचे अत्यंत प्रभावी टूल्स सायबर ठगांना मिळाले. त्यातून त्यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे एकापाठोपाठ एक प्रकार समोर आले. त्यातून लोक धडा घेत नाहीत, तोच एआय आणि डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट व्हिडीओ समोर येऊ लागले. खर्या व्यक्तीचा चेहरा, आवाज आणि हावभाव हे व्हिडीओमध्ये कृत्रिमरीत्या इतके प्रभावीपणे मांडले जाते की, उच्चशिक्षितांचीही फसगत होईल.
सायबर ठगांनी चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे अॅप तयार केले. त्यावर एआय आणि डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ तयार करत तो प्रसारित केला. त्यात गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. त्यातून 200 लोकांना दोन कोटींचा गंडा घातला. गेल्या मे महिन्यात बंगळुरू येथे ही घटना समोर आली.
दुसर्या घटनेत एआय-पावर्ड फेस-स्वॅपिंग तंत्राद्वारे मित्रानेच मित्राचा बनावट व्हिडीओ तयार केला. तसेच व्हिडीओ कॉलद्वारे मित्राला मदतीच्या नावे एक कोटी रुपयांची मागणी केली. मित्राने तत्काळ एक कोटी रुपये मदत म्हणून पाठवले. मात्र, हा सर्व बनाव असल्याचे समोर आले. ही घटना दिल्लीत समोर आली.
* व्हिडीओमधील व्यक्तीच्या चेहर्याच्या हालचाली, डोळ्यांचा फोकस व आवाजातील समन्वयाचे निरीक्षण करावे.
* व्हिडीओमध्ये चेहरा स्थिर असतो व ओठ हलत असतात. त्यामुळे चेहर्यावरील भाव आवाजाशी विसंगत असतात.
* व्हिडीओमध्ये सावलीची दिशा आणि शरीराभोवतीचा उजेडही व्हिडीओ बनावट असल्याचे संकेत देतो.
* व्हिडीओमध्ये एखादे चिन्ह किंवा वॉटरमार्क दिलेला असतो, त्याचेही निरीक्षण करावे.