AI education  Priya Sharma
नाशिक

AI education : साडेसात लाख विद्यार्थ्यांना ‘कोडिंग, एआय’चे धडे

राज्यातील 827 'पीएमश्री' शाळांत तंत्रज्ञानात्मक, अनुभवाधिष्ठित शिक्षण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिलीप सूर्यवंशी

Pradhan Mantri School for Rising India (PM Shri) Scheme

प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 827 शाळांमधील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांना कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 516 शाळांमध्ये योजना राबविण्यात आली असून, त्यामध्ये 426 प्राथमिक व 90 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने पीएमश्री योजनेंतर्गत देशभरातील 14 हजार 500 हून अधिक शाळांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शाळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील 827 शाळांची निवड झाली आहे. यामध्ये 207 प्राथमिक, 468 उच्च प्राथमिक, 110 माध्यमिक आणि 42 उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. योजनेंतर्गत, एआय मॉड्युल शिकविले जाते. आठवी ते दहावीपर्यंत हे मॉड्युल वैकल्पिक (स्कील सब्जेक्ट) विषय म्हणून दिले जाते. शिक्षकांना एनसीईआरटी, सीबीएसई व निष्ठा पोर्टलद्वारे एआय प्रशिक्षण दिले जाते.

पहिल्या टप्प्यात पीएमश्री योजनांतर्गत कार्यान्वित शाळा

जिल्हा - शाळा संख्या

  • अहमदनगर -21

  • अकोला -11

  • अमरावती- 18

  • औरंगाबाद -11

  • बीड -13

  • भंडारा- 34

  • चंद्रपूर -18

  • धुळे- 7

  • गडचिरोली -16

  • गोंदिया -13

  • हिंगोली -5

  • जळगाव -18

  • जळ्णा- 12

  • कोल्हापूर -18

  • लातूर- 13

  • नागपूर- 21

  • नांदेड- 18

  • नंदुरबार -8

  • नाशिक -26

  • उस्मानाबाद- 9

  • पालघर- 11

  • परभणी -11

  • पुणे -23

  • रायगड -20

  • रत्नागिरी -13

  • सांगली- 14

  • सातारा- 18

  • सिंधुदुर्ग -13

  • सोलापूर- 23

  • ठाणे -14

  • वर्धा -13

  • वाशीम- 7

  • यवतमाळ -26

  • एकूण - 516

(आकडेवारी : 27 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसभा प्रश्नोत्तरातून घेण्यात आली आहे)

'दीक्षा अ‍ॅप'वर एआयसाठी ई-लर्निंग मॉड्युल्स उपलब्ध असून, शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, इंटरनेट, डिजिटल साधने व एआय प्रयोगशाळांची सुविधा पुरवली जात आहेत. ज्यात संगणक, प्रोजेक्टर, डिजिटल बोर्ड यांचा समावेश आहे. सतत व समग्र मूल्यांकन (सीसीई) पद्धतीद्वारे एआय प्रकल्प, सादरीकरण, शंका-समाधानावर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. विद्यार्थ्यांच्या एआय आधारित प्रकल्पांचे प्रदर्शन शाळा व जिल्हास्तरावर भरविले जाते.

एआय आधारित शिक्षणक्रम

  • तंत्रज्ञानाधारित शिक्षण : टॅबलेट्स, स्मार्ट टीव्ही, ई-कंटेंटद्वारे डिजिटल शिक्षण कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवीन विषयांची ओळख.

  • अनुभवाधारित शिक्षण : पुस्तकांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीवर आधारित शिक्षण प्रोजेक्ट्स, फिल्ड व्हिजिट्स, कला, हस्तकला इत्यादींचा समावेश.

  • सक्षम व प्रशिक्षित शिक्षक : शिक्षकांचे नियमित प्रशिक्षण (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार) नवे शिक्षण तंत्र, मूल्यांकन पद्धतींचे ज्ञान.

  • भौतिक सुविधा व सुरक्षितता : स्वच्छ शौचालये, मुला/मुलींसाठी वेगळ्या सुविधा, शाळा इमारतीचा चांगला दर्जा, सुरक्षित परिसर.

  • परिवहन व संगणकीय प्रवेश : दुर्गम भागातील शाळांमध्ये प्रवेशासाठी मदत इंटरनेटसह संगणक कक्ष आणि ऑनलाइन अभ्यासासाठी सुविधा.

  • नियमित मूल्यांकन व गुणवत्ता तपासणी : विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत मूल्यांकन सुधारणांवर वैयक्तिक लक्ष.

एआयचे प्रशिक्षण

एआय शिक्षणात मूलभूत संकल्पनांची ओळख करून दिली जाते, ज्यामध्ये एआय म्हणजे काय, त्याचा वापर आणि समाजावर होणारा प्रभाव समाविष्ट आहे. प्रशिक्षण प्रक्रियेत प्रयोगशील शिक्षणाला प्राधान्य दिले जाते, जसे की प्रत्यक्ष उदाहरणे, मिनी प्रोजेक्ट्स आणि सिम्युलेशन्स. शिक्षण अधिक रंजक करण्यासाठी व्हिडिओ, अ‍ॅनिमेशन आणि एआय गेम्सचा वापर केला जातो.

विद्यार्थ्यांना कोडिंग कौशल्ये शिकवण्यासाठी स्कॅच, ब्लॉकी आणि पायथॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शन केले जाते. यासोबतच, टिचेबल मशीन्स, गुगल एआयसारखी टुल्स वापरून मुलांना मशीन लर्निंगचे प्राथमिक ज्ञान दिले जाते. शेवटी, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, चेहरा ओळखणे, पर्यावरण संरक्षण यांसारख्या थीमबेस्ड प्रकल्पांद्वारे शिकवलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT