Ashadhi Ekadashi 2024
नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला मिळाला महापूजेचा मान file photo
नाशिक

Pandharpur Wari | 16 वर्षांची वारी फळाला, नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला मिळाला महापूजेचा मान

पुढारी वृत्तसेवा
सटाणा : सुरेश बच्छाव

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामधील अंबासन येथील बाळू शंकर आहिरे व आशाबाई बाळू आहिरे या सर्वसामान्य शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत संधी मिळाल्याची वार्ता तालुकाभरात पोहोचताच सर्वत्र आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.

बागलाण तालुका वारकरी संप्रदायात सदैव आघाडीवर राहिला असून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या जायखेडा येथील कैलासवासी ह.भ.प.कृष्णाजी गुरुजी माऊली यांच्या दिंडीद्वारे गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून पंढरपूर वारी करणाऱ्या दांपत्याच्या वाट्याला हा बहुमान आल्याने तालुकाभरातील वारकऱ्यांना पावन झाल्याची अनुभूती येऊन गेली.

अंबासन येथील अल्पभूधारक शेतकरी बाळू आहिरे हे स्वतःच्या थोड्याशा शेतीसोबत दुसऱ्यांची शेतीही तोडबटाईने कसतात. तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते पत्नीला सोबत घेत भाजीपाला विक्रीचा व्यवसायही करतात. त्यांना दोन मुले असून एक इलेक्ट्रिक दुकान चालवतो तर दुसरा मुलगा नामपुर बाजार समितीत माथाडी कामगार आहे. आहिरे यांचे आई-वडीलही विठुरायाचे भक्त असल्याने त्यांच्याकडून चालत आलेल्या पंढरपूरवारीच्या परंपरेला बाळूही पुढे चालवीत आहेत. आतापर्यंत त्यांनी पंधरा ते सोळा वेळा पंढरपूरवारी केली असून जायखेडा येथील कैलासवासी ह.भ.प. कृष्णाजी गुरुजी माऊली यांच्या नेतृत्वाखालील त्रंबकेश्वर व पंढरपूरवारीत ते नियमित सहभागी होतात.

विठुरायाच पावला

गावातील राम मंदिर व सावता महाराज मंदिर आणि घरातील देव्हाऱ्यातील देवांची ते दररोज मनोभावे पूजाअर्चा करीत असतात. चालू वर्षी वडील शंकर यांची तब्येत ठीक नसल्याने पायी दिंडीत न जाता बाळू हे पत्नी आशाबाई व आई यशोदाबाई यांच्या समवेत एसटी बसने पंढरपूर येथे रवाना झाले. सोमवारी (दि.१५) रात्री तेथे पोहोचल्यापासून त्यांनी लगेच बारीत उभे राहून दर्शनासाठी विठुरायाला आळवणी घातली. दैवयोगाने त्यांना थेट मुख्यमंत्र्यांसोबतच सपत्नीक महापूजा करण्याचे भाग्य लाभले. यामुळे त्यांच्या वडिलांसह कुटुंबीय व ग्रामस्थांना तसेच संपूर्ण बागलाण तालुकावासीयांनाच गौरवास्पद अनुभूती येऊन गेली. अजातशत्रू आहिरे दाम्पत्याला ही अविस्मरणीय संधी मिळाल्याने विठुरायाच पावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT