पणजी : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) तिकीट आकारणी असलेल्या संरक्षित स्मारकांच्या सुधारित मसुदा यादीत गोव्यातील वरचा आग्वाद किल्ल्याचा समावेश केला आहे. या यादीत समाविष्ट झालेले गोव्यातील हे एकमेव स्मारक आहे.
आग्वाद किल्ल्याला 'ब' श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.
या श्रेणीत देशातील १३६ केंद्रीय संरक्षित तिकीट आकारणीच्या स्मारकांचा समावेश आहे. यात ऐतिहासिक किल्ले, राजवाडे, लेणी, मंदिरे तसेच पुरातत्त्वीय अवशेषांचा समावेश आहे. याशिवाय, 'ए' श्रेणीत ३० प्रमुख स्मारके आणि वारसा संकुलांचा समावेश करण्यात आला आहे.
एएसआयकडून स्मारकांचे वर्गीकरण प्रवेश शुल्काची श्रेणी निश्चित करण्यासाठी तसेच पर्यटकांच्या प्रवेशाचे नियमन करण्यासाठी केले जाते.
त्यामुळे आग्वाद किल्ल्याचा 'बी' श्रेणीत समावेश झाल्याने तो 'ए' श्रेणीतील स्मारकांसाठी लागू असलेल्या उच्च प्रवेश शुल्काच्या श्रेणीबाहेर राहणार आहे. या संदर्भातील प्राथमिक अधिसूचना ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मसुद्याबाबत नागरिक, पर्यटन क्षेत्रातील घटक आणि संबंधित हितधारकांना आक्षेप किंवा सूचना नोंदवण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.