नाशिक : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यंदा जिल्हयात सहा लाख ४४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार असून, त्यासाठी एक लाख २१ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली. मात्र, अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतू, राज्यातील सर्व भागात 15 जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. पंधरा जूननंतरच पावसाची मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. पाऊस सक्रीय झाल्यानंतरच, शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवात करावी असे कृषी विभागाने सांगितले आहे.
जिल्हयात गतवर्षी खरीप हंगामाचे क्षेत्र सहा लाख ३२ हजार हेक्टर इतके होते. यात मका, सोयाबिन व भात ही तीन प्रमुख पिके आहेत. कडधान्यात तूर, मूग, उडीद यांचे क्षेत्र वर्षागणिक कमी होत आहे. गळीत धान्यात भुईमूग, कारळे, सोयाबिन व नगदी पिकांमध्ये कापसाचे क्षेत्र काही प्रमाणात वाढलेले दिसते. मक्याची सरासरी सव्वा दोन लाख हेक्टरवर पेरणी होते. त्यापाठोपाठ सोयाबीन ७५ हजार हेक्टर आणि कापसाची ४६ हजार हेक्टरवर लागवड होते.
जिल्हयातील शेतकऱ्यांना मक्याचे ५४ हजार क्विंटल बियाणे लागते. त्याच्याही किंमतीत यंदा वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. सोयाबिनचे ४४ हजार ४७६ क्विंटल बियाणे लागणार आहे. जिल्ह्यात बियाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. मे अखेर एक लाख क्विंटलपर्यंत बियाणे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बियाण्याचा कुठलाही तुटवडा भासणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
अडीच लाख टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यापैकी एक लाख ९ हजार ५६७ मेट्रिक टन खते सध्या दुकानदारांकडे शिल्लक आहेत. यात डीएपी, एमओपी, एनपीकेएस, युरिया आदींचा समावेश आहे. युरिया व डीएपी या खतांची संभाव्य मागणी विचारात घेऊन त्यांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.