नाशिक : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत खरिपाची २९.१७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात मका, बाजरी व ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे, तर भुईमूग, सोयाबीनची पेरणी अन् कापसाचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेला पाऊस जूनपर्यंत सुरू राहिला. जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पेरणीला गती आली आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना मुदतपूर्व पेरणी न करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ७ जूननंतर पेरणी सुरू झाली. शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पेरणीला गती आली. यंदा खरीप हंगामाची एकूण सहा लाख ४४ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत एक लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात विशेषत: नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, निफाड व सिन्नरच्या काही भागांत सोयाबीन, मका लागवड करण्यात येत आहे. जिल्ह्यात ज्वारी ४.८२, बाजरी १७.९५, मका ४८.०३, कडधान्य ३९.०९, तर भुईमूग १५.२९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीत मका पिकाची आघाडी असून, त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीन या पिकांचा समावेश होतो. जूनअखेर एकूण पेरणीचे क्षेत्र ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
भात पिकाचे क्षेत्र असलेल्या सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व पेठ या तालुक्यांमध्ये अजूनही पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. निफाडमध्ये द्राक्षाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, मक्याची पेरणी होते. परंतु, संततधार पावसामुळे या पेरण्या खोळंबल्या आहेत.