राहुल रनाळकर, नाशिक
राजकारण हे बुद्धिबळातील खेळाप्रमाणे असते. एक एक सोंगटी बाद करून प्रतिस्पर्ध्यावर या खेळात दबाव वाढवला जातो. सध्या या डावात अलीकडे तीन आणि पलीकडे तीन खेळाडू एकमेकांविरुद्ध ‘डोकॅलिटी’ लढवत आहेत. ज्या कच्च्या सोंगट्या सुरुवातीला गवसतील, त्यांचा पाडाव करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत जायचे, हा विरोधी पक्षांचा डाव सध्याच्या खेळात स्पष्ट दिसतोय. त्यात पहिली सोंगटी अर्थात धनंजय मुंडे धारातीर्थी पडले. आता नंबर माणिकराव कोकाटे यांचा दिसतोय. अन्य सत्ताधारी पक्षांचे अजून काही मंत्री विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. मात्र, आता कोकाटे यांच्या संदर्भातील निर्णय राष्ट्रवादी आणि भाजपने घेतल्यास सत्ताधारी बॅकफूटवर जाऊ शकतात.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या विरोधकांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरले आहेत. स्वतःच्या वागणुकीतील चुका आणि वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेमुळे कोकाटे यांना घेरणे विरोधकांना फार सोपे गेले. वागणूक आणि बोलण्याच्या संदर्भात कोकाटे हे राज्याला फारसे परिचित नव्हते. पाच टर्म आमदारकीची झाल्याने त्यांना मंत्रिपद देण्यात आले. पण, त्यांच्या सरळ, स्पष्ट बोलण्यामुळे नाशिक जिल्ह्याला ते चांगलेच परिचित आहेत. स्वभावाला मुरड घालणे हे त्यांना आजवर जमलेले नाही. जुने मुरब्बी, मातब्बर आमदार असल्याने कृषिमंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली. ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे विरोधक म्हणूनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले. पण, कोकाटे यांना हे खाते मानवले नाही, हे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतून स्पष्ट होते.
अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात फारसे सख्य कधीच नव्हते, हे सगळ्यांना माहीत आहे. पण, भुजबळ एवढे हेविवेट नेते आहेत. त्यांचा मुलगा पंकजला विधान परिषद देऊन भुजबळ यांनाही मंत्रिपद देणे राष्ट्रवादीला भाग पडले. मुंडेनंतर ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना डावलणे राष्ट्रवादीला शक्य झाले नाही. तथापि, भुजबळांची पक्षातील, जिल्ह्यातील जागा घेणे माणिकरावांना जमले नाही, हे आता स्पष्ट होत आहे. गेल्या सरकारातील कृषिमंत्रिपद नाशिक जिल्ह्यातील दादा भुसे यांच्याकडे होते. तेव्हाही सरकारची आर्थिक स्थिती जेमतेमच होती. पण, तारेवरची कसरत करत भुसे यांनी हे मंत्रिपद निभावून नेले. मालेगाव या कृषी बहुल परिसरात आपला दादा आताच्या मंत्र्यांपेक्षा बराच बरा होता, अशी चर्चाही शेतशिवारात रंगताना दिसते. प्राप्त परिस्थितीत अत्यंत हलाखीत असलेल्या शेतकर्यांच्या स्थितीवर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न माणिकरावांनी करणे अपेक्षित होते, ते प्रयत्न दिसून येत नाहीत.
राज्याचा राजकारणाचा एक बाज आहे. त्यात अजित पवार हे नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीची एक कार्यशैली आहे. त्यात काही केल्या माणिकरावांना बसता आले नाही, हे स्पष्टपणे दिसते. मात्र, या कार्यशैलीत स्वतःला बसविण्याचा आटोकाट प्रयत्न ते करत आहेत. केवळ आमदार असताना सकाळी उशिरा उठण्याचा शिरस्ता त्यांनी अनेक वर्षे कायम ठेवला. रात्री उशिरापर्यंत काम करण्याची त्यांची आधीची सवय बदलणे त्यांच्यासाठी जिकिरीचे ठरताना दिसते. जिम, पूजा स्कीप करणेही त्यांना कठीण जाते. परिणामी लोकांना अटेंड करणे, मंत्रालयातील कामांचे संतुलन सांभाळणे ही माणिकरावांसाठी तारेवरची कसरत ठरते. माणिकरावांच्या कन्या सिमंतिनी या सिन्नर विधानसभेतील बहुतांश जबाबदार्या पार पाडतात. त्यामुळे मतदारसंघाबाबत कोकाटे हे निश्चिंत आहेत.
समज देऊन मंत्रिपद कायम ठेवणार ः 20%
कोकाटे माफी मागू शकतात ः 20%
पक्षाकडून मंत्रिपद काढून घेतले
जाऊ शकते ः 30%
प्रोफाईल बदल करून अन्य खाते सोपविले जाऊ शकते ः 30%
1. वक्तव्यावर खुले स्पष्टीकरण : कोकाटेंकडून माफीसद़ृश स्पष्टीकरण दिले जाईल आणि त्यावर पक्ष ‘ही बाब इथेच थांबवूया’ असे म्हणू शकतो.
2. पक्षामार्फत ताकीद : पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागल्याने पक्ष नेतृत्व त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेत ताकीद देऊ शकतो.
3. मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह : जनक्षोभ खूप वाढला, तर दबावाखाली सरकार त्यांना मंत्रिपदावरून बाजूला करण्याचा पर्यायदेखील स्वीकारू शकते; पण ही शक्यता सध्या कमी दिसत आहे.
4. समज देऊन भविष्याचे संकेत : त्यांच्या भविष्यातील वर्तनावर नजर ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. म्हणजे, पुढे अजून वादग्रस्त विधान झाल्यास कठोर कारवाई होण्याची शक्यता राहते.
सध्या कोकाटे यांच्याकडून स्पष्टीकरण घेतले जाईल, पक्ष ताकीद देईल आणि मंत्रिपद तातडीने धोक्यात येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, राजकीय डॅमेज कंट्रोलसाठी त्यांना यापुढे संयमाने बोलावे लागेल.
महाराष्ट्र राज्य हे एकेकाळी विचारप्रधान, समंजस आणि प्रगल्भ राजकीय परंपरेसाठी ओळखले जायचे. येथे गटतट होते; परंतु चर्चेची एक सुसंस्कृत चौकट होती. तथापि, अलीकडच्या काळात राजकारणाच्या प्रवाहात विचाराऐवजी वाक्य, योजनांऐवजी योजना विरोध आणि लोकप्रश्नांऐवजी लोकांचा अपमान करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
सध्याच्या राजकारणात संवाद नव्हे, तर आरोप-प्रत्यारोप, विधानांचे अतिशयोक्त मूल्यांकन आणि ‘काय बोलले, केवळ यावर केंद्रित चर्चा सुरू आहे. कोकाटे यांच्या कृती आणि विधानाचा निषेध योग्य आहे. कारण, मंत्रिपदावर असताना जबाबदारीने वागणे, बोलणे अपेक्षित आहे. पण, त्या विधानावर सगळ्यांचा अमूल्य वेळ खर्च होतो आणि शेतकर्यांच्या खर्या प्रश्नांवरची चर्चा पुन्हा एकदा टळते, हे दुर्दैव आहे.
विरोधी पक्षाने कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करून राजकीय संधी साधण्याचा प्रयत्न केला, हे उघड आहे. शेतकरी आत्महत्या, हमीभाव, कर्जमाफी, पीकविमा योजना, बियाण्यांचे दर या मुद्द्यांवर ठोस प्रश्न विचारले गेले असते, तर ती खरी लोकशाहीतील जबाबदारी ठरली असती. पण त्याऐवजी गोंधळ, घोषणाबाजी, रस्त्यात रमी खेळणे, मंत्र्यांना घेराव घालणे, अख्खं सरकार शेतकरीविरोधी आहे, या घोषणा दिल्या गेल्या.
कोकाटेंच्या विधानावर वाद झाला; पण त्यानिमित्ताने खरे मुद्दे पुढे आले?
यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांचा काळा बाजार होत आहे.
हमीभाव अद्याप शेतकर्यांना मिळालाच नाही.
अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत.
पीकविमा कंपन्यांच्या मनमानीने शेतकरी हैराण आहे.
हे सगळे प्रश्न अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.
केवळ शब्दांवर राजकारण करणे थांबायला हवे. सत्ताधार्यांनी स्वतःच्या मंत्र्यांना जबाबदारीची सतत जाणीव करून द्यायला हवी. विरोधकांनी केवळ विरोधाचे रान न उठवता ठोस मुद्द्यांवर लढा दिला पाहिजे.