Adv. Nitin Thackeray  
नाशिक

Adv. Nitin Thackeray | अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे नेतृत्व; शिक्षणातून युवकांना रोजगार आणि उद्योजकतेची नवी दिशा

Adv. Nitin Thackeray | शिक्षणाचे खरे सामर्थ्य केवळ पदवी मिळवून देण्यात नसते, तर त्या शिक्षणातून व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता देण्यात असते.

पुढारी वृत्तसेवा

शिक्षणाचे खरे सामर्थ्य केवळ पदवी मिळवून देण्यात नसते, तर त्या शिक्षणातून व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता देण्यात असते. बदलत्या काळातील आव्हाने, रोजगाराच्या नव्या संधी, कौशल्यांची वाढती गरज आणि उद्योजकतेचे विस्तारते विश्व यांचा वेध घेत शिक्षण संस्थांनीही आपल्या कार्याची दिशा व्यापक केली पाहिजे. ही काळाची गरज ओळखून मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी संस्थेच्या कार्यात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रमांची भर घालण्यावर भर दिला आहे. आज दि. २७ नोव्हेंबर त्यांचा वाढदिवस!

शतकाहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेली मराठा विद्या प्रसारक समाज ही राज्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. कर्मवीरांनी अथक परिश्रमांतून उभारलेल्या या संस्थेचा लौकिक, तिची मूल्ये आणि तत्त्वे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी नेहमीच पूजनीय मानली. या परंपरेचा सन्मान राखत, संस्थेच्या मूळ विचारांना डावलून नव्हे, तर त्यांना समकालीन संदर्भ देत स्वतःचे व्हिजन संस्थेच्या कार्यात समाविष्ट करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.

भूतकाळातील मूल्यांची शिदोरी, वर्तमानातील गरजांची जाणीव आणि भविष्याचा अचूक वेध या तिन्हीची अनोखी सांगड त्यांच्या कार्यशैलीत दिसून येते. २४ तास कार्यरत असणारे सरचिटणीस, असे त्यांच्या कामाचे वर्णन केले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. सातत्यपूर्ण नियोजन, कल्पकता, संस्थेतील विविध घटकांशी समन्वय आणि नव्या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्याची धडाडी यांमुळे संस्थेत आज अनेक सकस, नावीन्यपूर्ण आणि भविष्यवेधी उपक्रम आकाराला आले आहेत.

युवक ही केवळ संस्थेची विद्यार्थीसंख्या नसून देशाच्या भविष्याची शक्ती आहे, या विचारातून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला संस्थात्मक पातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे. याच दृष्टिकोनातून मविप्र फिटनेस अ‍ॅकॅडमीची संकल्पना आकाराला आली. शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैली यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

मविप्र माउंटेनिअरिंग क्लबच्या माध्यमातून साहस, धाडस, संघभावना, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न होत आहे. शारीरिक क्षमतेसोबत मानसिक कणखरपणा निर्माण करण्यासाठी शिक्षणाच्या कक्षेत अशा उपक्रमांना स्थान देणे, ही बदलत्या शिक्षणविचारांची महत्त्वपूर्ण दिशा आहे.

रोजगाराच्या प्रश्नाकडे पाहताना केवळ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर उद्योगविश्व आणि युवक यांच्यात थेट संवादाचे पूल उभारणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून बॉश टेक्निकल स्किल सेंटर आणि सीआयआय मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रमांना चालना मिळाली. या प्रयत्नांतून चार हजारांहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

नामांकित कंपन्यांच्या सहभागातून आयोजित रोजगार मेळावे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजा समजून घेण्याबरोबरच आपल्या कौशल्यांना अनुरूप करिअर निवडण्याची संधी देतात. शिक्षण आणि प्रत्यक्ष रोजगार यांच्यातील अंतर कमी करून युवकांना केवळ प्रमाणपत्र नव्हे, तर रोजगाराच्या बाजारपेठेत टिकून राहण्याची क्षमता देण्याचा हा प्रयत्न आहे.

उद्योजकता ही रोजगारनिर्मितीची महत्त्वाची शक्ती आहे, हे लक्षात घेऊन मराठा उद्योजक मेळाव्यांची संकल्पना पुढे आणण्यात आली. सुमारे दोन हजार उद्योजकांना एकत्र आणणाऱ्या या व्यासपीठातून ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या व्यावसायिक संदर्भांची देवाण-घेवाण झाली आहे.

परस्पर सहकार्य, व्यावसायिक संपर्क आणि नव्या संधी निर्माण करणाऱ्या या व्यासपीठामुळे युवकांसमोर नोकरी शोधण्यापलीकडे रोजगार निर्माण करण्याचा विचारही दृढ होत आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणे म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मितीला बळ देणे, या व्यापक भूमिकेचे प्रतिबिंब या उपक्रमात दिसते.

मविप्र माजी विद्यार्थी संघाची 'त्रिरश्मी फेलोशिप' माजी विद्यार्थ्यांना संस्थेशी जोडून त्यांच्या अनुभव, ज्ञान आणि योगदानाचा लाभ पुढील पिढीला मिळवून देण्याच्या विचारातून महत्त्वाची ठरते.

तसेच आयसर, आयुका आणि एमएसएफडीए यांसारख्या संस्थांशी रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार, एचआरडीसीच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक क्षमतावृद्धीचे प्रयत्न संस्थेच्या गुणवत्तावर्धनाला नवी दिशा देतात.

या सर्व उपक्रमांमागे केवळ वर्तमानातील गरजा पूर्ण करण्याची भूमिका नाही, तर भविष्यातील आव्हानांसाठी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना तयार करण्याचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन आहे. काळाच्या गरजा ओळखून आवश्यक बदल स्वीकारणे, परंपरेचा आधार घेत नव्या संकल्पनांना आकार देणे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी उपयोग करून संधी निर्माण करणे, हे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य ठरते.

कर्मवीरांच्या विचारांचा वारसा जपत आधुनिक शिक्षणाच्या नव्या क्षितिजांकडे वाटचाल करणाऱ्या मविप्रच्या कार्याला या दृष्टिकोनातून नवे परिणाम प्राप्त झाले आहेत. संधींची वाट पाहणारी नव्हे, तर स्वतःच्या क्षमतेवर संधी निर्माण करणारी पिढी घडविण्याचा अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा हा प्रयत्न संस्थेच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा आहे.
– विश्वासराव मोरे, उपाध्यक्ष, मविप्र समाज, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT