महाराष्ट्र स्वाभीमान सभेत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल  (छाया-हेमंत घोरपडे)
नाशिक

Aditya Thackeray | बदलापूर लाठीचार्जचे आदेश देणारा जनरल डायर कोण?

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अंतरवलीत मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्जचे पाप माथ्यावर असताना बदलापूरमधील अत्याचाराविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर निर्दयी लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमधील खरा जनरल डायर कोण? असा संतप्त सवाल करत शिवसेना (उबाठा) युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

दुर्दैवी घटना घडत असताना 'घटनाबाह्य' मुख्यमंत्री आपल्या शेतात तर गृहमंत्री दिल्लीत होते, असा आरोप करत या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. हिम्मत असेल तर, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिण योजनेच्या अनुदानात आताच वाढ घोषित करावी, असे आव्हान देत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत महिलांना देण्यात येत असलेली रक्कम वाढविण्यात येईल. त्याचबरोबर महिलांना सुरक्षा देखील देऊ, त्यासाठी शक्ती कायदा लागू करू, असे आश्वासनही आ. ठाकरे यांनी यावेळी दिले.

भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित महाराष्ट्र स्वाभीमान सभेत ते बोलत होते. राज्यातील महायुती सरकारवर आसूड ओढताना आ. ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विकास भाजपची पोटदुखी असल्याची टीका केली. लोकसभा निवडणूक नव्हे तर अन्यायी, अत्याचारी सरकारविरोधातील लढाई होती. या देशात केवळ संविधानाचे राज्य चालेल हे या निवडणुकीने दाखवून दिले. हा लढा संपला नाही तर सुरू झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखविण्यासाठी, स्वाभीमानासाठी, संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन लढायला सज्ज व्हा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले. राज्यातील मिंधे सरकारने पराभवाच्या भीतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या नाही. आता विधानसभेची निवडणूक देखील पुढे ढकलू पाहत आहे. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्राला लुटायला निघाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महायुतीतील लुटारू मंत्री आणि त्यांची साथ करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असे ठासून सांगत नाशिक-मुंबई महामार्गासह राज्यातील महामार्गांची दूरवस्था झाली असताना मिंधे सरकारचे मंत्री ठेकेदारांकडे टक्केवारीची मलई चाखण्यात व्यस्त आहेत, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला. लाडकी बहिण योजनेतून पैसे हवे की सुरक्षा असा महिलांना सवाल करत गेली दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार सुरू असताना सरकारला लाडक्या बहिणी का आठवल्या नाहीत, असा सवाल करत राज्याच्या मंत्रीमंडळातच महिलांवर अत्याचाराचे गुन्हे असलेले दोन मंत्री आहेत. असे लोक कधी लाडक्या बहिणींचे भाऊ हाेऊ शकतात का, अशी टिका देखील त्यांनी केली.

यावेळी खा. राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, वसंत गिते, डी. जी. सूर्यवंशी आदींची भाषणे झाली.

वीज गायब, फडणवीसांविरोधात घोषणाबाजी

आदित्य ठाकरे यांचे भाषण रंगात आले असताना अचानक दादासाहेब गायकवाड सभागृहातील वीज पुरवठा खंडित झाला. अवघ्या सभागृहात अंधार पसरला. त्यामुळे सभागृहात उपस्थित शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर काही क्षणात वीज पुरवठा सुरळीत झाला. यावेळी नाशिकचे दत्तक पिता कुठे गेले, असा सवाल करत महाराष्ट्राची अशी परिस्थिती असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT