पिंपळगाव बसवंत (नाशिक) : स्मशानभूमी बद्दलच्या पारंपारिक गैरसमजांना फाटा देत गेल्या काही वर्षांपासून पिंपळगाव बसवंत येथील स्मशानभूमीत अभिनव पद्धतीने दिवाळी साजरी केली जात आहे. यंदाही दीपावलीच्या निमित्ताने आकाशकंदील, विविध रंगांच्या आकर्षक रांगोळीसह रंगीत दिव्यांची सुशोभित रोषणाई स्मशानात करण्यात आल्याने स्मशानभूमी परिसर लक्ष- लक्ष दिव्यांनी उजळून निघाला.
स्मशानभूमीबाबत प्राचीन काळापासून मानवी मनात अनेक भीती आणि अंधश्रद्धा निर्माण आहेत. आज तंत्रज्ञान व विज्ञानाच्या युगात माणुस चंद्र, मंगळ ग्रहावरील स्वारी करीत आहे. त्यामुळे अनेक अनुत्तरीत प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळालेली आहेत. त्यामुळे जुन्या प्राचीन अंधश्रद्धा निर्माण करणाऱ्या गोष्टींना विज्ञान युग मूठमाती देत आहे. मात्र, तरीही अनेकांच्या मनात स्मशानभूमीबाबत अंधश्रध्दा आहेत. त्या नाहीसा दूर करण्यासाठी पिंपळगाव बसवंतचे काही नागरिक गेल्या दहा वर्षापासून दिवाळीत स्मशानभूमीत विविध रंगाची आकर्षक रांगोळी आणि रंगीत दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी करतात.
दैनावस्था फिटण्यासाठी आरास
येथील निफाड रोडवरील पिपळगाव बसवंत- बेहेड फाट्याजवळ पाराशरी नदी काठावर असलेल्या स्मशानभूमीची झाड लोट करून पाण्याने स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विद्युत रोषणाईसह आकाशकंदील लावून स्मशानभूमी सुशोभित करण्यात आली होती. मानवाचा शेवट ज्या स्मशानभूमीत होतो तिच्या स्वच्छतेचे महत्व समजावे व मनातील अंधश्रद्धा, गैरसमज दूर होऊन विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्यासाठी हा दिवाळी सण स्मशानभूमीत सजरा करण्यात आला.
स्मशानभूमीविषयी माणसांच्या मनात असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर व्हावी. विज्ञान युगात जगताना पूर्वग्रह अंधश्रद्धा नाहीसा व्हावा. अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश सर्वसामान्य मनात उतरावा या जाणिवेतून अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवित आहोत.राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते
रांगोळी अन् दिव्यांची रोषणाई
येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार हे पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उदरनिर्वाहासाठी आपला छोटासा व्यवसाय सांभाळून समाजकार्य कार्य करतात. समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याचा त्यांना कायम ध्यास असतो. यात हेतूने दिवाळीला स्मशानभूमी दिवाळी साजरी करून जनतेच्या मनातील अंद्धश्रद्धा दूरू करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. पवार व त्यांच्या वन्य जीव रक्षक सहकरी मित्रांच्या प्रयत्नाने गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.