नाशिक : आभा हेल्थ कार्ड बनविण्यात नाशिक जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर असून, 28 लाख 70 हजार 94 नागरिकांनी आभा कार्ड अर्थात आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्डची नोंदणी केली आहे. यामुळे नागरिकांना आपले हेल्थ अकाउंट निर्माण करण्यास मदत झाली आहे.
आभा हेल्थ कार्ड हे नागरिकांचे आरोग्य डिजिटल अकाउंट आहे. पुणे, मुंबई, ठाण्यानंतर आभा कार्ड नोंदणीमध्ये नाशिक आघाडीवर आहे. आभा कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पण, त्यासाठी नागरिकांची संमती अनिवार्य असेल. याशिवाय आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलिटही करण्याची सुविधाही या कार्डमध्ये आहे. आभा कार्डमुळे दवाखान्यात जाताना डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची चिठ्ठी किंवा मेडीकल रिपोर्ट सोबत न्यायची गरज पडणार नाही. आभा नंबर सांगितल्यास डॉक्टर रुग्णास पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील. त्यामुळे रुग्णाकडे जुन्या टेस्टचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची देखील बचत होणार आहे.
आभा म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड असून, ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल. आभा कार्ड आधार कार्डसारखे असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. या नंबरचा वापर करून रुग्णाची मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल. यात कोणत्या व्यक्तीवर कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल.
आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक आणि खासगी दवाखाने, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जाऊन बनवू शकता. किंवा ऑनलाईनही बनविण्यासाठी https://ndhm.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी