A ghat worth Rs 290 crores on the banks of the Goda river for the Simhastha
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणासाठी गोदावरी नदीकाठी महापालिका हद्दीत दसक व नांदूर शिवारात १११.९० कोटींचे दोन, तर त्र्यंबकेश्वर येथे उजव्या आणि डाव्या तीरावर १७८ कोटींचा एक असे तीन नवीन घाट बांधण्यास कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे पर्वणीकाळात भाविकांची गर्दी नियंत्रित करणे प्रशासनाला सोयीचे होणार आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. सिंहस्थ प्राधिकरणामार्फत पहिल्या टप्प्यात ५,१४० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. डिसेंबरअखेर १,००४ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. मार्च २०२६ पर्यंत ३,०६३ कोटींची कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला आहे.
त्यात गोदातीरी घाट बांधकामासाठी २४४ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात जवळपास पाच लाख साधू-महंतांसह पाच ते दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी नव्याने पाच घाट प्रस्तावित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात गोदावरीवर नाशिक शहरात दोन प्रमुख घाट प्रस्तावित केले असून, त्याला प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १११ कोटी ९० लाखांच्या खर्चाला प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी मंजुरी दिली आहे. मार्च २०२७ पूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे.
कुंभमेळ्यात गोदावरी नदीला दीड किलोमीटर लांबीचे घाट बांधण्यात आले होते. २०१५-१६मध्ये सहा किलोमीटरपर्यंत घाटांची लांबी वाढविली होती. आता पुन्हा दसक व नांदूर शिवारात ४०० मीटरचे दोन नवीन घाट बांधले जाणार आहेत. तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीवर उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी अडीच किलोमीटर लांबीचे घाट बांधले जातील. पर्वणी आणि अमृत स्नानावेळी गर्दी नियंत्रणासाठी हे नियोजन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गोदावरी नदीवर दसक पुलाच्या ऊर्ध्व बाजूला ४०० मीटर लांबीचा घाट : ५५.४२ कोटी
५६.४८ कोटी नांदूर शिवारात घाट बांधून परिसर विकसित करणे :
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठावर उजवा आणि डाव्या बाजूला घाट : १७७.८६ कोटी
सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणासाठी गोदावरी नदीकाठावर नव्याने घाट प्रस्तावित केलेत. त्यानुसार महापालिका हद्दीत दोन तर त्र्यंबकेश्वर येथे एक अशा तीन घाट व परिसर विकसित करण्यास मंजुरी दिली आहे.डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष, सिंहस्थ प्राधिकरण