NOTA Votes Municipal Election Result 
नाशिक

NOTA Votes Municipal Election Result : जळगावकरांचा राजकीय पक्षांना 'नोटा'चा आसूड; ३१ हजार मतदारांनी दाखवला उमेदवारांना 'ठेंगा'

Maharashtra Election Results Jalgaon: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागूनही नाराजीचा सूर कायम; प्रभाग क्रमांक ४ मध्ये मतदारांचा सर्वाधिक उद्रेक

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र पाटील

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या रणधुमाळीत अनेक दिग्गजांचे वारसदार, बड्या नेत्यांची मुले आणि अगदी मंत्र्यांचे पीए नशीब आजमावत होते. मात्र, सुज्ञ जळगावकर मतदारांनी यातील कोणालाही पसंती न देता तब्बल ३१ हजार ७०४ वेळा 'नोटा'चे (वरीलपैकी कोणीही नाही) बटन दाबून राजकीय पक्षांच्या तोंडावर सणसणीत चपराक लगावली आहे. ७५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ३२१ उमेदवारांपैकी एकालाही 'लायक' न समजता मतदारांनी व्यक्त केलेला हा संताप राजकीय वर्तुळाचे धाबे दणाणणारा आहे.

महानगरपालिकेच्या १९ प्रभागांतील ७५ नगरसेवक पदांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ३२१ उमेदवार रिंगणात होते. प्रचारादरम्यान अनेक मोठमोठ्या घोषणा झाल्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. मात्र, मतदान यंत्राचा निकाल समोर आल्यावर वेगळेच सत्य उघड झाले. जळगाव शहरातील ३१,७०४ मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारत 'नोटा'चा (NOTA) वापर केला आहे. विशेष म्हणजे सुज्ञ मानल्या जाणाऱ्या आणि प्रशासकीय कामात असलेल्या टपाली मतदारांमध्येही 'नोटा'चा वापर लक्षणीय आहे, हे या निवडणुकीचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वाधिक उद्रेक

शहरात उमेदवारांविषयी सर्वाधिक नाराजी प्रभाग क्रमांक ४ मध्ये दिसून आली. या एकाच प्रभागात तब्बल ३००६ मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे. याची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे:

प्रभाग ४ (अ): १०२ मते (९९९ ईव्हीएम + ३ टपाली)

प्रभाग ४ (ब): ५९५ मते (५९३ ईव्हीएम + २ टपाली)

प्रभाग ४ (क): ७८९ मते (७८८ ईव्हीएम + १ टपाली)

प्रभाग ४ (ड): ६२० मते (६१८ ईव्हीएम + २ टपाली)

असा एकूण ३००६ जणांनी या प्रभागातील उमेदवारांना साफ नाकारले आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ११, ५, १, १५, ३, ८, १२, १६ आणि १३ या प्रभागांमध्येही मतदारांनी उमेदवारांना नाकारल्याचे चित्र आहे. सर्वात कमी 'नोटा'चा वापर प्रभाग क्रमांक ७ मध्ये (२९३ मते) झाला आहे.

मंत्र्यांच्या पीएलाही 'नोटा'चा फटका

प्रभाग क्रमांक १५ (अ) मध्ये राज्याचे दिग्गज नेते आणि नामदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद भगवान देशमुख भाजपच्या तिकिटावर रिंगणात होते. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवाराचे आव्हान होते. असे असतानाही या प्रभागात तब्बल ८५४ मतदारांनी (३ टपाली मतांसह) 'नोटा'चा पर्याय निवडला. बड्या नेत्यांचा वरदहस्त असतानाही मतदारांनी दाखवलेला हा निरुत्साह बरेच काही सांगून जाणारा आहे.

टपाली मतदानातही नाराजीचा सूर

केवळ सामान्य जनताच नाही, तर निवडणूक कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक १३ (ड) मध्ये 'नोटा'चा वापर करणाऱ्या ८९३ मतदारांपैकी तब्बल ३९८ मते ही टपाली (Postal Ballot) आहेत. एका प्रभागात टपाली मतांचे एवढे मोठे प्रमाण 'नोटा'कडे जाणे, ही राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. एकूणच ३२१ उमेदवारांच्या गर्दीत ३१,७०४ मतदारांना आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी एकही सक्षम उमेदवार न वाटणे, हे राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

प्रभाग क्रमांक नोटा

प्रभाग क्रमांक- 1 : 2398

प्रभाग क्रमांक- 2 :1425

प्रभाग क्रमांक- 3 : 2098

प्रभाग क्रमांक- 4 : 3006

प्रभाग क्रमांक- 5 : 2482

प्रभाग क्रमांक- 6 : 1796

प्रभाग क्रमांक- 7 : 293

प्रभाग क्रमांक- 8 : 2093

प्रभाग क्रमांक- 9 : 819

प्रभाग क्रमांक- 10 : 1461

प्रभाग क्रमांक- 11 : 2699

प्रभाग क्रमांक- 12 : 2081

प्रभाग क्रमांक- 13 : 1942

प्रभाग क्रमांक- 14 : 805

प्रभाग क्रमांक- 15 : 2346

प्रभाग क्रमांक- 16 : 1994

प्रभाग क्रमांक- 17 : 952

प्रभाग क्रमांक- 18 : 341

प्रभाग क्रमांक- 19 : 673

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT