नाशिक : नववर्ष स्वागताचे निमित्त करीत 'थर्टी फर्स्ट'ला पार्टीचे नियोजन केले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सार्वजनिक ठिकाणी जास्त वावरतात. त्याचप्रमाणे मद्यपी, टवाळखोरांचाही वावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर- ग्रामीण पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाले आहेत. शहर- जिल्ह्यात नियमित वाहन तपासणी केली जात असून, दि. 1 जानेवारीपर्यंत बंदोबस्त कायम राहणार आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार, नागरिकांना थर्टी फर्स्टनिमित्त 1 जानेवारीच्या पहाटे 5 पर्यंत मद्य सेवन करता येणार आहे. मद्य विक्रीची दुकाने मध्यरात्री 1 वाजता बंद होणार असून, हॉटेल पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे मद्यपींकडून कोणताही अपघात, गुन्हा घडू नये यासाठी शहरासह जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. मद्यपींची धरपकड करताच जिल्ह्यात अमली पदार्थ वापरासंदर्भातही शोध घेण्यास पथकांनी सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सर्व पोलिस पथकांना आदेश देत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरासह जिल्ह्यातील हॉटेल, बारची तपासणी सुरू आहे. रिसॉर्ट, फार्म हाउसची तपासणी करून पाटर्यांवरही पथकांनी नजर ठेवली आहे.
अनेकदा पाटर्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी अमली पदार्थ शोधण्यासाठी श्वान पथके तयार केली आहेत. शहर पोलिस दलातील मॅक्स आणि ग्रामीण पोलिसांचे रॉकी व ॲना हे दोन श्वान अमली पदार्थांचा शोध घेतील. त्याचप्रमाणे खबऱ्यांचे जाळे विणण्यात आले असून, अमली पदार्थ विक्रेत्यांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
हॉटेल, परमिट रूम आणि बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार असून, मद्य विक्रीची दुकाने मध्यरात्री 1 पर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मद्यपींना पहाटेपर्यंत मद्यसेवन करता येणार असले, तरी त्यांना मद्यसेवन परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना मद्यसेवन, वाहतूक किंवा साठा केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
मद्यपींसह गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी केली असून, महत्त्वाच्या ठिकाणी स्पीडगन, ब्रेथ ॲनलायजर मशीनने चालकांची तपासणी केली जाईल. दि. ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत बंदोबस्त राहणार असून, शहरात १३, तर जिल्ह्यात ४० पोलिस ठाण्यांची कुमक तैनात राहील. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल, जलद प्रतिसाद पथकेही बंदोबस्तावर तैनात राहणार असून, निर्भया, दामिनी मार्शल्स, डीबी मोबाइलची रात्रभर गस्त असेल.