नाशिक : शहरात लाखो भाविकांनी घरात, तर सुमारे ७५० सार्वजनिक मंडळांनी गणरायाची स्थापना करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. तर उत्सव काळात देखावे पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीने शहर पाेलिसांनी बंदोबस्तासह, वाहतूक व वाहनतळाचे नियोजन केले आहे. शहरात सुमारे तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार असून रेकाॅर्डवरील गुन्हेगारांसह टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
निर्विघ्न उत्सवासाठी शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या, तर ग्रामीणमध्ये पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासह वाहतुकीचे नियोजन केले आहे. मोठ्या मंडळांसह मौल्यवान गणपती मंडळांजवळ पाेलिसांचा फौजफाटा राहणार असून 'सीसीटीव्ही'वरही भिस्त ठेवण्यात येत आहे. तसेच गर्दीत भुरट्या चोरांना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनास असतील. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया, दामिनी पथकांची गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त राहणार आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी मिळून सुमारे सहा हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. तसेच राज्य राखीव दल, होमगार्डचाही अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणत्याही मंडळास डीजेला परवानगी नसेल. शिवाय लेझर लाइट बसविण्यावरही पोलिसांनी निर्बंध लादले आहेत. तसेच सार्वजनिक मंडळांनीही स्वयंस्फूर्तीने लेझर लाईटचा वापर टाळण्याचे ठरवले आहे.
- गोल्फ क्लब मैदान, डोंगरे वसतिगृह मैदान (जुना गंगापुर नाका), गौरी पटांगण, पंचवटी, म्हसोबा पटांगण, पंचवटी, तपोवन, निलगीरी बाग छ. संभाजी नगर रोड, संभाजी स्टेडीयम, सिडको, पवननगर मैदान, सिडको, मराठा हायस्कुल गंगापुर रोड, शरदचंद्र पवार मार्केट, पेठ रोड, कवडे गार्डन गंगापुर रोड
पाेलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक, ३०० सहायक व उपनिरीक्षक, सुमारे तीन हजार पोलिस अंमलदार, एक एसआरपी कंपनी, एक आरसीपी, एक हजार २०० महिला व पुरुष होमगार्ड
पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन अतिरीक्त पोलिस अधीक्षक, आठ उपविभागीय अधिकारी, ४० प्रभारी निरीक्षक, सुमारे तीन हजार पोलिस अंमलदार, एक हजार ५५० होमगार्ड, आरसीपीच्या सहा तुकड्या, एसआरपीएफची एक कंपनी, दोन उपविभागीय व १६ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकही बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत.
जिल्ह्यात यंदा ८०४ गावांनी 'एक गाव एक गणपती' बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ५८८ मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळे व एक हजार १७१ लहान मंडळांनी गणपती बसवण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केले आहेत.