सप्तशृंगगडावर ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान आदिमाया सप्तशृंगी मातेचा नवरात्रोत्सव पार पडणार आहे.  file photo
नाशिक

Vani Saptashrungi Devi Temple |नवरात्रोत्सवात भगवतीचे २४ तास दर्शन, पाहा कसे आहे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान आदिमाया सप्तशृंगी मातेचा नवरात्रोत्सव पार पडणार आहे. या काळात नऊ ते १० लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात ६५ सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. (Navratri Festival Vanigad)

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळवण प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी आकनुरी नरेश व तहसीलदारांच्या उपस्थित सप्तशृंगगडावर यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक घेण्यात आली. त्यात नवरात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली. यात प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर टाळाण्यात यावा यासाठी गडावरील टोलनाक्यावर भाविकांची तपासणी करण्यात यावी, अशी सूचना नरेश यांनी दिली.

ट्रस्टतर्फे श्री भगवती मंदिर, सभामडंप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, मोफत महाप्रसाद व्यवस्था तसेच परिसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने पहिल्या पायरीजवळ दोन व मंदिरात दोन असे चार मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. यात्रा कालावधीत नांदुरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून, गडावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गावातील वाहने व अतिमहत्त्वाच्या भाविकांकरिता वाहने गडावर नेण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. नांदुरी वाहनतळावर तात्पुरती स्वच्छतागृहे, शौचालये उभारण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदुरी व सप्तशृंगगड येथे पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, महिला पोलिस निरीक्षक, महिला होमगार्ड व नागरिक संरक्षण दल, ग्रामसुरक्षा दल, अग्निशमन दल आदींचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, जनसंपर्क भिकन वांबळे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कळवणचे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वनविभाग अधिकारी, रोपवे व्यवस्थापन अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

४५० बसेसचे नियोजन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवरात्रोत्सवासाठी 375 बसेसचे नियोजन केले आहे. कळवण आगाराकडून नांदुरी ते सप्तशृंगगडासाठी ८०, तर जळगाव, नंदुरबार, धुळे व इतर ठिकाणी जाण्या-येण्यासाठी ३७५ अशा एकूण सुमारे ४५० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गर्दी वाढल्यास जादा बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून, भाविकांसाठी सप्तशृंगगडावर धोंड्या-कोंड्याच्या विहिरीजवळ स्वतंत्र बसस्थानक उभारण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT