Engineering College 
नाशिक

Engineering seats vacant | इंजिनीयरिंगच्या 23 हजार 107 जागा रिक्त

प्रवेशाची चौथी 'कॅप' फेरी सुरू; तब्बल एक लाख पाच हजार १८५ विद्यार्थी 'बेटरमेंट'च्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी पदवी प्रवेशप्रक्रियेची तिसरी केंद्रीय प्रवेश फेरी पूर्ण झाली असून, आता चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिसऱ्या फेरीत पसंतीक्रम नोंदविलेल्या २ लाख ४ हजार ९८७विद्याथ्यापैकी १ लाख १६ हजार ६९० विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. मात्र, मिळालेले महाविद्यालय किंवा शाखा बदलून अधिक चांगला पर्याय मिळावा, यासाठी तब्बल १ लाख ५ हजार १८५ विद्यार्थी 'बेटरमेंट'च्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, चौथ्या फेरीसाठी राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकूण २३ हजार १०७ जागा रिक्त असल्याचे जाहीर केले आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे चौथ्या केंद्रीय प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयनिहाय रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांना ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरून पसंतीक्रम निश्चित व कन्फर्म करता येणार आहे. या फेरीतील तात्पुरते महाविद्यालय वाटप ३ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. चौथ्या फेरीत उपलब्ध जागांचा विचार करून विद्यार्थ्यांनी शाखा आणि महाविद्यालयाचे पसंतीक्रम काळजीपूर्वक भरावेत.

यापूर्वीच्या फेरीत जागा मिळालेल्या मात्र 'बेटरमेंट'चा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही चौथ्या फेरीत अधिक पसंतीचे महाविद्यालय किंवा शाखा मिळण्याची संधी आहे. त्यामुळे उपलब्ध रिक्त जागा, मागील प्रवेशातील स्थिती आणि स्वतःचा पसंतीक्रम यांचा योग्य ताळमेळ साधणे आवश्यक आहे.

ऑप्शन फॉर्म कन्फर्म केल्यानंतर त्यात बदल करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी माहितीची पडताळणी करूनच अंतिम पसंतीक्रम लॉक करावा. विद्यार्थ्यांना मिळालेली जागा स्वीकारण्यासाठी तसेच संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चितीसाठी ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान मुदत दिली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रे, शुल्क आणि प्रवेशासंदर्भातील इतर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर ८ ते १५ सप्टेंबरदरम्यान संस्था पातळीवरील प्रवेशप्रक्रिया राबविणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम कट-ऑफ तारीख १५ सप्टेंबर सायंकाळी ७ पर्यंत आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

रिक्त जागा तपासा : पसंतीक्रम निश्चित करण्यापूर्वी महाविद्यालयनिहाय उपलब्ध रिक्त जागांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. शाखानिहाय आणि महाविद्यालयनिहाय उपलब्ध जागांची माहिती तपासल्यानंतरच पर्याय निवडल्यास प्रवेशाची शक्यता अधिक अचूकपणे निश्चित करता येईल.

थेट महाविद्यालय प्रवेश

चौथ्या फेरीतही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ८ ते १५ सप्टेंबरदरम्यान संस्था पातळीवरील रिक्त जागांसाठी संबंधित महाविद्यालयांमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यामुळे चौथ्या फेरीनंतरही प्रवेशाची संधी उपलब्ध राहणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT