मालेगाव : मोहरम हा इस्लाम धर्मातील महत्त्वाचा सण असून, तो इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृतिनिमित्त साजरा करण्यात येतो.
शहर व परिसरात शिया व सुन्नी पंथीयांकडून रविवारी (दि. 6) पारंपरिक पद्धतीने मोहरम सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 224 ताबूत, 57 सवारी, 5 आलमपंजाची स्थापना करण्यात आली. 7 ठिकाणांहून शेरबाग निघणार आहे. मोहरमच्या दिवशी नमाज पठण करून दुवा- ए- आशुरातून हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. सोमवारी (दि. 7) मिरवणूक काढत विधिवत ताबुतांचे विसर्जन होईल.
इस्लामिक नवीन वर्ष म्हणजे मोहरमच्या 1 तारखेपासून मजलिस पठणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मशिदींमधून मजलिसद्वारे इमाम हुसैन यांच्या करबला युद्धातील बलिदानाची माहिती प्रवचन स्वरूपात दिली जात आहे. गुरुवारी शिया बांधवांनी आलम जुलूस काढला. तसेच हुसेनी मशिदीत दररोज मौलाना फजली मुमताज यांचे प्रवचन होत आहे. मोहरमच्या दिवशी रविवारी उपवास करत नमाज व दुवा आशुराचे पठण केले जाईल. करबला युद्धात शहीद झालेल्या इमाम हसन हुसैन व त्यांच्या कुटुंबीयांना आदरांजली वाहून शोक व्यक्त केला जाईल. सोमवारी ताबूत विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने मनपा प्रशासनाने मिरवणूक मार्गांची स्वच्छता करून अडथळे हटविण्याची कार्यवाही हाती घेतली आहे. मोहरम पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातील चांदणी चौकातील चांदीचा ताजिया नागरिकांचे आकर्षण असतो. या ताजियाला 74 वर्षांची परंपरा आहे. पूर्वी हाजी मोहंमद हुसेन हे हा ताजिया तयार करत होते. आता हाजी निजामुद्दीन जुगनू मंडपवाले व त्यांची मुले दरवर्षी स्वखर्चाने ताजियात चांदीची भर घालतात. यासाठी कुठलाही चंदा जमा केला जात नाही.