नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत नाशिक येथील ऐतिहासिक 'अभिनव भारत मंदिर' येथील उर्वरित विकासकामांसाठी दोन कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी ही मंजुरी दिली असून, या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे.
विकासकामांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित 'होलोग्राम व्हिडिओ' आणि त्यांनी मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून देणारी 'भाषाशुद्धी वॉल' उभारण्यात येणार आहे. सावरकरांनी मराठीला समृद्ध करण्यासाठी 'महापौर, संसद, दूरध्वनी, चित्रपट, आदेश, दिनांक' यांसारखे शेकडो नवे शब्द दिले. या वॉलच्या माध्यमातून त्यांच्या भाषिक आणि क्रांतीकार्याविषयी माहिती मिळणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आ. प्रा. देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या जागेची पाहणी करून या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात आली.
कामाची गुणवत्ता राखणे, वेळेत ई-निविदा प्रक्रिया राबवणे, दर्शनी भागावर माहितीफलक लावणे आणि काम पूर्ण झाल्यावर उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे सा.बा.विभागावर बंधनकारक असेल. पर्यटनाला चालना देणाऱ्या या निधीमुळे अभिनव भारत मंदिराच्या उर्वरित सर्व कामांना आता मोठा वेग मिळणार आहे.
मंजूर निधी केवळ प्रशासकीय मान्यताप्राप्त अंदाजपत्रकातील बाबींवरच खर्च करणे बंधनकारक असून, वाढीव निधी अनुज्ञेय राहणार नाही. तसेच कामाची तांत्रिक गुणवत्ता राखणे, मंजूर अंदाजपत्रक व आराखड्यानुसार काम पूर्ण करणे आणि आवश्यक तपासणी, संनियंत्रण व मूल्यांकनाची जबाबदारी अंमलबजावणी यंत्रणेची राहणार आहे. काम सुरू करण्यापूर्वी संबंधित जागेची मालकी, आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या संबंधित विभागांच्या अटी व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.