नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशाची बक्षिसी केंद्रातील भाजप सरकारने नाशिककरांना लागलीच दिली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदाघाट परिसरात 'राम काल पथ' उभारण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने १०० कोटींचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' पोस्ट करत याबाबत घोषणा केली आहे.
देशभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २३ राज्यांमधील ४० प्रकल्पांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. या प्रकल्पांवर ३२९५ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून, त्याद्वारे जागतिक मानांकनानुसार पर्यटन केंद्रांचा विकास करण्याची योजना आहे. यात महाराष्ट्रातील नाशिक व सिंधुदुर्ग या दोन शहरांमधील प्रकल्पांचा समावेश आहे. नाशिक शहरात राम काल पथ उभारण्यासाठी ९९.१४ कोटी, तर सिंधुदुर्गकरिता ४६.९१ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यासाठी देशभरातील राज्यांमधून प्रस्ताव मागविले होते. २०२४- २५ या आर्थिक वर्षाकरिता दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याला जास्तीत जास्त अडीचशे कोटी, तर प्रत्येक प्रकल्पासाठी १०० कोटींपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ६६ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात ३४ टक्के निधी केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे.
या योजनेसाठी महापालिकेने सुरुवातीला ३०४ कोटींचा प्रकल्प आराखडा सादर केला होता. राज्य शासनाच्या निर्देशांनंतर तो २४८ कोटींपर्यंत आणण्यात आला. मात्र, प्रकल्पासाठी १०० कोटींची मर्यादा असल्याने हा प्रकल्प दोन भागांत करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार पहिला भाग १४६ कोटी, तर दुसरा भाग १०२ कोटींचा असणार आहे. पहिल्या टप्प्यातील १४६ कोटींपैकी केंद्राकडून १०० कोटींचे अर्थसहाय्य मिळणार असून, उर्वरित ४६ कोटी राज्य शासन व महापालिका निधीतून खर्च केला जाणार आहे.
प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साकारणाऱ्या या राम काल पथ प्रकल्पांतर्गत सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यात अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधीतलाव, रामकुंड व लगतच्या भागात पौराणिक अनुभूती येईल, अशा प्रकारचे सुशोभीकरण करण्याची तसेच रामकुंड परिसरात धनुर्धारी रामाची भव्य प्रतिकृती उभारण्याची योजना आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारने नाशिककरांना दिलेली ही भेट आहे. या प्रकल्पात गोदाघाट परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना यातून रोजगारही उपलब्ध होईल.- ॲड. राहुल ढिकले, आमदार, भाजप
नाशिककरांसाठी अत्यंत चांगली बातमी आहे. ही योजना व इतर योजनांमधून मिळणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर करून गोदाघाट परिसराला नवे वैभव प्राप्त करून देऊ. या प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होईल. -डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक