नाशिक

Nashik News | बागलाणमध्ये १० मेंढ्यांचा 'ब्ल्यू टंग' ने मृत्यू; पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : बागलाण तालुक्यामध्ये चरणासाठी आलेल्या एका मेंढपाळाच्या कळपामधील १० मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाने तत्काळ त्यांचे नमुने ताब्यात घेत तपासणी केली आहे. तपासणीअंती हे मृत्यू 'ब्ल्यू टंग' (Blue-Tongue) आजाराने झाले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.

शेळ्यांना विषाणूमुळे होणाऱ्या आजारांमध्ये ब्ल्यूटंग, बुळकांडी आणि मावा या आजारांचा समावेश होतो.'ब्ल्यु टंग' (Blue-Tongue) या आजारात शेळ्यांची जीभ निळी होते. ओरबीव्हायरस (Orbivirus) नावाच्या विषाणूमुळे शेळ्यांमध्ये या रोगाची बाधा होत असते.

संबंधित मेंढपाळाकडे १०० मेंढ्या आणि २० शेळ्या असून त्यातील या ६ मेंढ्यांना तीव्र ताप, श्वासोच्छवासात धाप लागत असल्याने तपासणी पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे पथक पोहोचेपर्यंत ३ मेंढ्यांचा मृत्यू झाला. तालुक्यातील तीन पशुवैद्यकांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर इतर मेंढ्यांना प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात आले होते. सध्या हे पथक इतर मेंढ्यांचे नियमित तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. या मेंढ्यांच्या कळपाला स्वतंत्र जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. नव्याने आलेल्या गवतामधील विषाणुंमुळे अशा प्रकारचे आजार हे केवळ मेंढ्या आणि शेळ्यांनाच होत असतात. तरी देखील सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे.

'ब्ल्यू टंग' अशी आहेत लक्षणे...

या आजारात जनावराला तीव्र स्वरूपाचा ताप येतो. तापाची तीव्रता १०४ ते १०६ अंश फॅरेनहाईटपर्यंत असते. ताप पाच ते सात दिवसापर्यंत राहतो. बाधित शेळ्या-मेंढ्याच्या नाकातून स्त्राव येतो. डोळ्यातून सतत पाणी येत राहते. तोंडातून लाळ गळत राहते. शेळ्या-मेंढ्याची जीभ सुजून काळी-निळी पडते. म्हणून या आजाराला नीलजिव्हा किंवा 'ब्ल्यू टंग' (Blue Tongue) असे म्हणतात. जनावरांच्या तोंडाला आणि खुरांना सूज येते. काही वेळेस खुरे वेगळी झाल्याने, जनावरे लंगडायला लागतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT