नाशिक : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी जिल्हा नियोजन समितीदेखील पुढे सरसावली असून, पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशांनंतर महानगरपालिकेने फाळके स्मारकासाठी १० कोटींच्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रस्तावाद्वारे केली आहे.
महापालिकेने १९९९ मध्ये पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत फाळके स्मारकाची उभारणी केली. हा प्रकल्प केवळ नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला होता. त्याकडे महापालिकेचा एकमेव फायद्यातील प्रकल्प म्हणून बघितले जात होते. कालांतराने या प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. देखभालीवर होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाच्या तुलनेत तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल मात्र अल्प असल्याने हा प्रकल्प तोट्यात गेला. गेल्या २५ वर्षांत या प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीवर तब्बल १३ कोटींचा खर्च झाला आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाची अवस्था दयनीय झाली आहे.
या प्रकल्पाच्या पुनर्विकासाची योजना गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. परंतु, ती वास्तवात उतरू शकलेली नाही. प्रारंभी हा प्रकल्प खासगीकरणातून विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रियादेखील अंतिम केली होती. परंतु, तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासगीकरणास विरोध दर्शविल्यानंतर महापालिकेच्या निधीतून या प्रकल्पाच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला गेला. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, फाळके स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री भुसे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे.
दादासाहेब फाळके स्मारकात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून संगीत कारंजा, अस्तित्वातील विविध दालनांचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर उद्यान व विद्युत विषयक कामे केली जाणार आहेत. विविध शोभेच्या वनस्पतींची लागवड स्मारक परिसरात केली जाणार आहे.