उत्तर महाराष्ट्र

Nashik : दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत; करंजवण येथे वासराचा पाडला फडशा

गणेश सोनवणे

दिंडोरी, (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा :

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी परिसरामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास करंजवण येथील कोंड वस्तीवरील अनिल कोंड याच्या दिड वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन वासराचा फडशा पाडला. बिबट्याने वॉल कंपाऊडमध्ये प्रवेश करुन हल्ला केला या हल्ल्यात वासरु ठार झाले. या हल्ल्यानंतरही बिबट्या येथे जवळ जवळ दिड ते दोन तास थांबला असल्याचे येथील रहिवासियांनी सांगितले.

या घटनेने करंजवण परिसरामध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.  लावण्याची मागणी होत आहे. कादवा नदी परिसरातील करंजवण, ओझे, म्हेळुस्के, कादवा माळूगी, नळवाडी, खेडले, लखमापूर परिसरामध्ये बिबट्याचा अनेक वर्षापासून वावर वाढला आहे. यापूर्वी या परिसरात बिबट्याने लहान मुलांवरही हल्ले केले असून आता बिबट्याने पाळीव प्राण्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

या परिसरातील गायी, म्हशी, कुत्रे, मांजरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यासह अनेक प्राण्यावर बिबट्याने हल्ले करुन त्यांना फस्त केले आहे.  दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत असून नागरिक दहशतीखाली आहेत. कादवा नदी परिसरातील ज्या गावांमध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे अशा ठिकाणी शेतमजूर देखील कामासाठी येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.  ओझे, करंजवण, लखमापूर, म्हेळुस्के, नळवाडी हा परिसर धरणाचा व नदीचा असल्यामुळे येथे उसाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणावर आहे. बिबट्याला पिण्यासाठी पाणी व लपण्यासाठी उसाच्या शेताची चांगली सोय झाल्यामुळे येथे बिबट्यांचा वावर वाढत आहे. त्यामुळे तालुका वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंजऱ्याची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नदी परिसरातील गावांमध्ये सध्या बिबट्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागने वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून येथे पिंजरा लावावा. अनिल कोंड, करंजवण

SCROLL FOR NEXT